Maharashtra Election 2019: 'हे' आहेत सर्वात श्रीमंत उमेदवार; संपत्ती पाहून व्हाल गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 13:34 IST2019-10-19T13:28:47+5:302019-10-19T13:34:00+5:30
Maharashtra Election 2019 सर्वाधिक श्रीमंत उमेदवार भाजपाचे; काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर

Maharashtra Election 2019: 'हे' आहेत सर्वात श्रीमंत उमेदवार; संपत्ती पाहून व्हाल गार
मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज थंडावतील. प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांच्या श्रीमंतीची चर्चा होते. यंदाची निवडणूकदेखील त्याला अपवाद नाही. निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले १००७ उमेदवार कोट्यधीश आहेत. यामध्ये सर्वाधिक उमेदवार सत्ताधारी भाजपाचे आहेत.
यंदाच्या निवडणुकीत भाजपा सर्वाधिक १६४ जागा लढवत आहे. यापैकी १५५ उमेदवारांच्या संपत्तीचा आकडा एक कोटीहून अधिक आहे. घाटकोपर पूर्व मतदारसंघातून लढणारे पराग शहा राज्यातले सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे तब्बल ५०० कोटींची संपत्ती आहे. भाजपानं प्रकाश मेहता यांचं तिकीट कापून शहांना संधी दिली आहे. राज्यातले दुसऱ्या क्रमाकांचे श्रीमंत उमेदवारदेखील भाजपाचेच आहेत. मलबार हिल मतदारसंघातून लढणाऱ्या मंगलप्रभात लोढा यांची संपत्ती ४४१ कोटी रुपये आहे.
श्रीमंत उमेदवारांच्या यादीत काँग्रेसचे संजय जगताप तिसऱ्या स्थानी आहे. त्यांची संपत्ती २४५ कोटी आहे. ते पुरंदरमधून निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. जगताप यांच्यासह काँग्रेसचे १२६ उमेदवार कोट्यधीश आहेत. काँग्रेस यंदा १४७ जागांवर लढत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या तुलनेत अधिक जागा लढवत असलेल्या भाजपाचे १५५ म्हणजेच ९६ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. यंदा भाजपा १६४ जागा लढवत आहे. शिवसेनेचे ९४ टक्के म्हणजेच ११६ उमेदवार कोट्यधीश आहेत. शिवसेना यंदा १२४ जागा लढवत आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला १२४ जागा आल्या आहेत. मात्र त्यांनी तीन जागांवरील उमेदवार मागे घेतले. राष्ट्रवादीचे १०१ उमेदवार कोट्यधीश आहेत.