Maharashtra Election 2019: BJP Criticized Sharad Pawar on Call me a Prime Minister once in a lifetime | 'मोडून पडलं स्वप्न माझं आणि मोडला आहे कणा; एकदा तरी आयुष्यात मला पंतप्रधान म्हणा'

'मोडून पडलं स्वप्न माझं आणि मोडला आहे कणा; एकदा तरी आयुष्यात मला पंतप्रधान म्हणा'

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी काही तासात संपणार आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाने विरोधकांना घायाळ केलं आहे. रम्या या काल्पनिक पात्राद्वारे भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. साताऱ्यात भर पावसात शरद पवारांनी भाषण केले त्याचं कौतुक होत असताना रम्या कवितेच्या 'पावसाने' साहेबांना भिजवणार आहे. असं सांगत 'बारामतीचा कणा' नावाची कविता जाहीर केली आहे. 

कवी कुसमाग्रजांची कविता पाठीवर हात ठेऊन लढ म्हणा या कवितेचा संदर्भ घेत सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. शरद पवार यांना इतिहास आठवताना स्व. वसंतदादा पाटील यांच्याकडे जाऊन आपलं मनमोकळं करतात.  मात्र दुखा:च्या भरात 'कणा' या कवितेतील शब्द मात्र बदलले असं सांगत पवारांवर जोरदार टीका केली आहे. 

बारामतीचा कणा
ओळखलं का सर मला,
राज्यात आलं कुणी पक्ष होता कर्दमलेला, तुम्हालाच पाजलं होतं पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला दिल्लीकडे पाहून
सोनिया बाई पाहुणी आली गेली सत्तेत राहून
इटलीवासिणीच्या इशाऱ्यावर १० वर्षे नाचलो
कमळापाशी जाऊ कसा? म्हणून महाराष्ट्रातच साचलो
२०१४ पासून मात्र पक्ष खचला, सत्तेची चूल विझली
फडणवीसांनी होते नव्हते ते नेले, प्रसाद म्हणून पक्षासाठी ४ नेते ठेवले
पुतण्या, लेकीला घेऊन संगती, सर बारामती लढतो आहे
केलेले पाप धुतो आहे, चिखल गाळ काढतो आहे.
सत्तेकडे हात जाताच रडत रडत उठला 
पाठिंबा नको सर, राजकारणात जरा एकटेपणा वाटला
मोडून पडलं स्वप्न माझं, आणि मोडला आहे कणा
एकदा तरी आयुष्यात मला पंतप्रधान म्हणा

२१ ऑक्टोबरला राज्यात मतदान होणार आहे. २८८ जागांसाठी होणाऱ्या मतदानासाठी प्रत्येक पक्षाने जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न केला आहे. प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. निवडणुकीच्या आखाड्यात पैलवान कोण याची चर्चा जास्त झाली. मात्र येत्या २४ तारखेला राजकीय आखाड्यातील कोणत्या पैलवानाने बाजी मारली हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कळणार आहे. 

Web Title: Maharashtra Election 2019: BJP Criticized Sharad Pawar on Call me a Prime Minister once in a lifetime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.