जळगाव रेल्वे दुर्घटनेची तात्काळ दखल; परदेशातून CM देवेंद्र फडणवीसांनी दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 20:40 IST2025-01-22T19:13:24+5:302025-01-22T20:40:05+5:30
जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. घटनास्थळी ८ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

जळगाव रेल्वे दुर्घटनेची तात्काळ दखल; परदेशातून CM देवेंद्र फडणवीसांनी दिले आदेश
जळगाव - राज्यातील जळगावच्या पाचोरा येथे पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या अफवेने ८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्याचं कळताच प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी रेल्वेतून उडी मारली मात्र दुर्देवाने समोरून येणाऱ्या कर्नाटक बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडले. त्यामुळे मोठी जीवितहानी झाली. या घटनेची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून जिल्हाधिकारीही पोहचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. घटनास्थळी ८ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 22, 2025
माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण…
त्याशिवाय सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपत्कालीन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तसेच या दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडेजवळ मोठा रेल्वे अपघात घडला आहे. बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवल्याची प्राथमिक माहिती आहे. लखनौ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस ही जळगावहून पाचोऱ्याकडे जात होती. पुष्पक रेल्वेने अचानक ब्रेक मारल्याने चाकांमधून ठिणग्या उडाल्या. त्यानंतर आग लागल्याची अफवा उडाल्याने रेल्वेतील प्रवाशांनी खाली उड्या मारल्या परंतु, दुसऱ्या रेल्वे लाईनवरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवले. जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.