Maharashtra CM : सध्यातरी अजित पवारांकडेच मोठी पॉवर; आमदारांना ऐकावेच लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 12:53 IST2019-11-23T12:52:29+5:302019-11-23T12:53:34+5:30
एकीकडे शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी भाजपाशीही बोलणी सुरू ठेवली होती.

Maharashtra CM : सध्यातरी अजित पवारांकडेच मोठी पॉवर; आमदारांना ऐकावेच लागणार?
मुंबई : राष्ट्रवादीच्या आमदारांनी हजेरीपत्रावर केलेल्या सह्यांचा वापर सत्तास्थापनेसाठी केल्याचा आरोप अजित पवारांवर केला आहे. यामुळे अजित पवारांनी बंडखोरी केल्याने त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांनी भावूक होत व्हॉट्स अॅप स्टेटस ठेवले आहेत.
एकीकडे शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी भाजपाशीही बोलणी सुरू ठेवली होती. तर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचीही अजित पवारांच्या बंडाला साथ असल्याचे समजते आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधिमंडळाचे राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यामुळे त्यांना आमदारांना मतदान करण्यासाठी व्हीप काढण्याचा अधिकार आहे. यामुळे ते तातडीने व्हीपही बजावू शकतात. तसेच त्यांना गटनेतेपदावरून काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांना बैठक घेऊन तसे पत्र विधानसभाध्यक्षांना द्यावे लागणार आहे. हे झाल्यानंतरच अजित पवार यांचे अधिकार संपुष्टात येतील.
तसेच विधानसभा अध्यक्ष निवड ही गुप्त मतदानाद्वारे घेतली जाते. यामुळे येत्या 3-4 दिवसांत तीन दिवसीय विधिमंडळ अधिवेशन बोलावले जाईल. यामध्ये विधानसभा अध्यक्ष निवडला जाईल. यामुळे राष्ट्रवादीचे आमदार कोणाला मतदान करतात हे कळणार नाही. तसेच शिवसेनेचा एक गट फुटल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समोर येत आहे. तसेच पवार यांच्या शपथविधीनंतर मुंडे यांचा फोनही स्वीच ऑफ येत आहे. यामुळे धनंजय मुंडे, सुनिल तटकरे आदी नेते शरद पवार यांच्यासोबत असल्याचे कळत आहे.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारही अज्ञातस्थळी रवाना झाले असून राष्ट्रवादी, शिवसेनेची पत्रकार परिषद काही वेळातच होणार आहे.