'तो' घटनाक्रम सांगत छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट; थेट अजित पवारांवर रोख?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:32 IST2024-12-18T15:31:53+5:302024-12-18T15:32:27+5:30
ज्यांनी मला जीवाचं रान करून निवडून आणले ते डोकी फोडतील ना...राज्यसभेवर जाण्यासाठी मला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. पण मी माझ्या लोकांना आज सोडू शकत नाही असं भुजबळांनी स्पष्टच सांगितले.

'तो' घटनाक्रम सांगत छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट; थेट अजित पवारांवर रोख?
नाशिक - लोकसभा निवडणुकीत मी नाशिकमधून उभं राहावे असं मोदी-शाहांनी सांगितले होते. त्याबाबत दिल्लीत चर्चाही झाली. मी तिकीट मागितले नाही तरीही मला उभं करण्याचं ठरलं गेले. मी तयारी केली. परंतु ४ आठवडे उलटूनही नाव आलं नाही. जो न्याय नितीन पाटलांना मिळाला तो मला का नाही?, माझ्या मंत्रिपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आग्रह धरला परंतु शेवटी घेतलेच नाही असं सांगत छगन भुजबळांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्याशिवाय घाईघाईत प्रश्न सुटत नाही. सगळ्यांशी चर्चा करून विचारपूर्वक पाऊल उचलणार असा सूचक इशाराही अजित पवारांना दिला आहे.
नाशिकमध्ये अखिल भारतीय समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला गेला. त्यात छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी घडलेला घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले की, मोदी-शाह यांनी नाशिक लोकसभेत भुजबळांना उभे करावे सांगितले. शिंदे म्हणाले ती आमची जागा आहे तेव्हा वरिष्ठांनी त्यावर आपण पर्याय काढू असं शिंदेंना सांगितल्यानंतर सगळे शांत बसले. मी आणि समीर भुजबळ नाशिकच्या दिशेने होतो तेव्हा प्रफुल पटेल, सुनील तटकरेंचा निरोप आला. ताबडतोड अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर या, आम्ही गेलो तिथे काय झालं विचारले? तेव्हा सांगण्यात आले रात्री ३ वाजेपर्यंत बैठक झाली. मग मला नाशिक लोकसभेबाबत झालेला निर्णय सांगण्यात आला. मी तिकीट मागितले नव्हते, मी म्हटलं समीरला उभं करा ते म्हणाले मोदी-शाहांनी सांगितले तुम्हीच उभे राहावे. मी म्हटलं मला विचार करायला २४ तास तरी द्या, त्यानंतर नाशिकला आलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटायला गेलो मी नको म्हटलं. तरी अजिबात काही चालणार नाही तुम्हालाच उभे राहावे लागेल. जर तुम्हाला उभं राहायचे नसेल तर तुम्ही दिल्लीला जाऊन सांगा असं मला सांगितले. मग मी निवडणुकीला तयार झालो असं त्यांनी सांगितले.
त्यानंतर नाशिकला आलो, प्रत्येक समाज घटकासाठी आपण काम केले. इतकी विकास कामे केलीत त्यामुळे पुन्हा नाशिकसाठी काहीतरी करण्याची संधी मिळणार यादृष्टीने तयारीला लागलो. लोकांनी मला सांगितले तुम्ही उभं राहा, दिल्लीला तुम्हाला मोठं पद देतील. त्यानंतर ४ आठवडे झाले तरी नाव कुणी घेतले नाही. शेवटच्या २-४ उमेदवारांच्या यादी बाकी होती. पण मी म्हटलं बस्स, आता किती थांबायचे. मी मागितले नव्हते, तुम्ही सांगितले म्हणून उभं राहण्याची तयारी केली. आता मी सहन करणार नाही, मी स्वत:हून जाहीर केले आता उभं राहणार नाही. जेव्हा जाहीर केले तेव्हा मला कुणीही सांगितले नाही की भुजबळ तुम्हीच उभे राहणार आहात. मग १० दिवसांनी मला म्हटले, भुजबळ तुम्हीच घाई केली. बरं ठीक, पण त्यानंतर राज्यसभेची वेळ आली तेव्हा मला सांगितले सुनेत्रा ताई पडल्या त्यामुळे त्यांचा विचार करावा लागणार. मी म्हटलं ठीक आहे. दुसऱ्या राज्यसभेसाठी मकरंद पाटलांचे बंधू नितीन पाटील यांना संधी दिली. खासदारासारखे पद देताना चर्चा करायला हवी होती. मलाही तुम्ही लढायला सांगितले, मी तयारी केली परंतु उमेदवारी मिळाली नाही. मग जो न्याय तुम्ही नितीन पाटलांना दिला तो मला का दिला नाही? असा सवाल भुजबळांनी अजित पवारांना विचारला.
दरम्यान, तुमची गरज राज्यात जास्त आहे. तुम्हाला इथं लढावं लागेल. पक्षाला पुढे न्यायचे असेल तुमचा चेहरा लागेल. माझ्याविरोधात सगळ्यांच्या बैठका झाल्या. रात्री १० वाजता अंतरवाली सराटीचे पुढारी आले, जिथे बैठक घेतली तिथे रात्री २ पर्यंत बैठका घेतला. त्याचा परिणाम झाला. मतदान कमी झाले पण आमचे लोक हिंमतीने लढले. आता मकरंद पाटील यांना मंत्री केले, त्यामुळे त्यांच्या भावाला राजीनामा द्यायला सांगून त्यांच्या जागी तुम्ही दिल्लीला जा असं मला सांगण्यात आले. आता ही वेळ आहे का? मला दिल्लीला पाठवायचे होते मग विधानसभा निवडणुकीला उभे करायचे नव्हते. ज्यांनी मला जीवाचं रान करून निवडून आणले ते डोकी फोडतील ना...राज्यसभेवर जाण्यासाठी मला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. पण मी माझ्या लोकांना आज सोडू शकत नाही असं भुजबळांनी स्पष्टच सांगितले.
अजित पवारांवर थेट रोख?
मंत्रिमंडळात मला घेण्यासाठी प्रफुल पटेल यांनी पराकाष्ठा केली, सुनील तटकरेंनीही केली. एवढेच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत भुजबळ मंत्रिमंडळात हवेत असा आग्रह धरला. सतत ४ दिवस त्यांच्या मागे होते, असं करू नका हे चुकीचे आहे असं सांगितले गेले. पण शेवटी घेतले नाही. आता हे झाले ते झाले, कुणी केले, याने केले, त्याने केले असं काही नाही. कुणीही बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही. प्रत्येक पक्षाचा नेता, विधिमंडळाचा नेता तोच त्या पक्षातील निर्णय घेत असतो असं सांगत भुजबळांनी अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
विचारपूर्वक पाऊल उचलावं लागेल, तुमची साथ हवी
माझ्या मंत्रिपदाचा प्रश्न नाही, समाजाचे जे प्रश्न उभे राहतील त्यावेळी संरक्षणाची ढाल कोण उभी करणार? हा प्रश्न आहे. मंत्रिपदे किती वेळा आली आणि गेलीत. विरोधी पक्षातही बसावे लागले पण त्याचे दु:ख नाही. ओबीसींनी महायुती सरकार आणलं मग असं का? यामागचा हेतू काय असा प्रश्न आहे. मंत्रिपद नसले तरी रस्त्यावर लढू, सभागृहात भांडू पण थेट अवहेलना करण्याचं शल्य मनात डाचतंय. घाईघाईत प्रश्न सुटत नाही. विचारपूर्वक पाऊल उचलावे लागेल. त्यावेळी मला तुमची साथ हवी. लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी, शक्ती एकटवण्यासाठी निदर्शने सुरू राहतील. संयमाने सगळं करावे लागेल. जिथे जिथे मला आमंत्रण येणार तिथे मी जाणार आहे. मंत्रिपदावर नसलो तरी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत, शेवटचा श्वासापर्यंत मागासवर्गीयांसाठी लढणार आहे. कुठल्याही दबावाला मी बळी पडणार नाही. मी तुमच्यासोबत राहणार आहे. अनेक राज्यातील, देशातील लोक आपल्यासोबत आहेत. हिंमत ठेवा, वाट पाहा. पुढे आणखी काही संकटे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा एकदा ओबीसी एल्गार पेटवावा लागेल असं सांगत छगन भुजबळांनी पक्षाला आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत.