'ग्लोबल' निघाले, फायदा काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 10:38 IST2026-01-11T10:38:18+5:302026-01-11T10:38:18+5:30
नवीन शाळांच्या मान्यतेसाठी आणि विद्यमान शाळांच्या नावात बदल करण्यासाठी क्षेत्रीय व राज्य स्तरावर प्रयत्न केले जातील.

'ग्लोबल' निघाले, फायदा काय?
दिनकर टेमकर
माजी शिक्षण संचालक
शिक्षण संचालकांनी १५ डिसेंबर २०२५ रोजी परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार, इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या नावात 'ग्लोबल', 'इंटरनॅशनल', 'सीबीएसई' आणि काही प्रकरणांत 'इंग्लिश मीडियम' असे शब्द वापरण्यावर निर्बंध घातले आहेत. हे शब्द फक्त खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय बोर्डाशी (जसे आयबी किंवा कॅम्ब्रिज) संलग्न किंवा परदेशात शाखा असलेल्या शाळांनाच वापरता येतील. इतर शाळांना नाव बदलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचे काय फायदे होतील?
महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या २०१२ नंतर, स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम आल्यानंतर खूप वेगात वाढली आहे. इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळा वाढल्यानंतर काही अडचणीसुद्धा निर्माण झाल्या. बऱ्याच इंग्रजी माध्यमातील शाळा सुरू झाल्या त्यांच्या नावामध्ये 'ग्लोबल', 'इंटरनॅशनल' असे शब्द आले. शाळांच्या नावांमधील या उल्लेखाने पालकांची फसगत होऊ लागली होती. आता याला आळा बसेल. नवीन शाळांच्या मान्यतेसाठी आणि विद्यमान शाळांच्या नावात बदल करण्यासाठी क्षेत्रीय व राज्य स्तरावर प्रयत्न केले जातील. यामुळे भविष्यात अशा दिशाभूल करणाऱ्या प्रथा कमी होतील आणि शिक्षण क्षेत्र अधिक विश्वासार्ह बनेल. एकूणच, हा निर्णय पालकांच्या हितासाठी क्रांतिकारी ठरेल.
या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल थांबेल. अनेक खासगी शाळा मार्केटिंगसाठी 'इंटरनॅशनल' किंवा 'ग्लोबल' असे आकर्षक शब्द वापरतात. पालकांना वाटते की शाळा परदेशी दर्जाची आहे, विशेष अभ्यासक्रम आहे किंवा आंतरराष्ट्रीय सुविधा आहेत
प्रत्यक्षात अशा शाळा राज्य बोर्ड किंवा स्थानिक अभ्यासक्रम चालवत असतात. हा नियम लागू झाल्याने पालकांना शाळेची खरी ओळख पटेल. अनावश्यक महागड्या फी आणि चुकीच्या अपेक्षांमुळे होणारा आर्थिक व मानसिक ताण कमी होईल.
दुसरा महत्त्वाचा फायदा असा की, पारदर्शकता वाढेल. शाळांच्या नावांमुळे अभ्यासक्रम, बोर्ड संलग्नता आणि शिक्षण माध्यम याबाबत स्पष्टता येईल. 'सीबीएसई' हा शब्द फक्त केंद्र सरकारच्या अधिकृत सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळांनाच वापरता येईल.
तिसरा फायदा म्हणजे शाळांमध्ये वास्तविक गुणवत्तेमध्ये भर पडेल. अनेक शाळा नावाच्या आकर्षणावर अवलंबून होत्या. आता नाव बदलण्याची सक्ती झाल्याने शाळांना शिक्षणाची गुणवत्ता, आधुनिक सुविधा, प्रशिक्षित शिक्षक आणि चांगले निकाल यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. यामुळे स्पर्धा वाढेल आणि एकूण शिक्षणस्तर उंचावेल.