"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 18:08 IST2025-07-16T17:34:20+5:302025-07-16T18:08:09+5:30
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: आज विधिमंडळाच्या आवारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमने सामने आले. या अनौपचारिक भेटीवेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या संवाद तसेच अंबादास दानवे यांच्या निरोप सभारंभावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ऑफर यामुळे आता राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेलं महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन हे आता अखेरच्या टप्प्यात आहे. तसेच विधिमंडळ परिसरातील अनेक घडामोडी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. या दरम्यान, आज विधिमंडळाच्या आवारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमने सामने आले. या अनौपचारिक भेटीवेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या संवाद तसेच अंबादास दानवे यांच्या निरोप सभारंभावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ऑफर यामुळे आता राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर वेळेवेळी बोचरी टीका करत असतात. मात्र आज विधिमंडळात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस समोरासमोर आले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक संवाद झाला. तसेच विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना महायुतीमध्ये येण्यासाठी थेट ऑफर दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की. उद्धवजी, सध्याची परिस्थिती पाहता आम्हाला २०२९ पर्यंत तिकडे येण्याची संधी नाही. मात्र तुम्हाला इकडे येण्याची संधी आहे. त्याचा विचार करता येईल. त्याचा आपण वेगळ्या पद्धतीने करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
एकीकडे राज्यात मराठीच्या मुद्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे यांची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीन शिवसेना शिंदे गटातील आमदार आणि मंत्री विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलेली ऑफर ही निव्वळ औपचारिकता होती की पडद्यामागे काही वेगळ्याच घडामोडी घडत आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.