"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:50 IST2025-07-01T16:50:21+5:302025-07-01T16:50:46+5:30
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला आहे. एका दिवसांचे निलंबनच काय आमदारकी व अख्खं आयुष्य शेतकऱ्यांसाठी देईन, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.

"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक
मुंबई - भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचा बाप असेल आमचा किंवा शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही असा घणाघाती हल्ला करत शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला आहे. एका दिवसांचे निलंबनच काय आमदारकी व अख्खं आयुष्य शेतकऱ्यांसाठी देईन, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.
शेतकरी प्रश्नावर आवाज उठवल्यानंतर नाना पटोले यांना विधिमंडळातून एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले, त्यानंतर विधिमंडळ परिसरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पटोले पुढे म्हणाले की, भाजपा हा शेतकरी विरोधी पक्ष आहे. भाजपा युती सरकारमधील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे नेहमीच शेतकऱ्यांचा अपमान करतात, आधी त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली. नंतर कर्जमाफीचे पैसे मुलामुलींच्या लग्नाला वापरा अशी वायफळ बडबड केली तर आता बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांचा अपमान केला. शेतकऱ्याला पेरणीला पैसे मोदी देतात, शेतकऱ्यांच्या घरच्यांना कपडे, मोबाईल हेही मोदी देतात असे विधान केले. २०१४ च्या आधी लोणीकर कपडे घालत नव्हते काय?, नंगे फिरत होते का?, असा संताप नाना पटोले यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, शेतमालाला हमी भाव देऊ, शेतीला २४ तास मोफत वीज देऊ अशी आश्वासने देऊन सत्तेत आले आणि आता शेतकऱ्यांचा अपमान करतात. हा सत्तेचा माज आहे पण आम्ही शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही. शेतकऱ्यांची लढाई लढत राहणार, आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी न डगमगता शेतकऱ्यासाठी लढत राहू. शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या बबनराव लोणीकर व मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, असेही नाना पटोले म्हणाले.