Anant Allishe : गरीब लेकरांच्या शिक्षणासाठी झटणारा ध्येयवेडा तरुण; कोण आहे 'मिशन मणिपूर' असलेला अनंत अल्लीशे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:05 IST2026-02-19T16:04:28+5:302026-02-19T16:05:37+5:30
Anant Allishe : २०२१ मध्ये पहिल्यांदा मणिपूरच्या भूमीत पाऊल ठेवलं तेव्हा या देवभूमीतला प्रवास आपलं अख्खं आयुष्य बदलून टाकणार आहे हे अनंत अल्लीशे या ध्येयवेड्या युवकाला माहिती नव्हतं.

Anant Allishe : गरीब लेकरांच्या शिक्षणासाठी झटणारा ध्येयवेडा तरुण; कोण आहे 'मिशन मणिपूर' असलेला अनंत अल्लीशे?
राजकारण, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठी नुकतीच नामांकनं जाहीर करण्यात आली आहेत. लोकसेवा-समाजसेवा या कॅटेगरीमध्ये सोलापूरच्या अनंत अल्लीशे यांची निवड करण्यात आली आहे.
'मिशन मणिपूर' या अनंत यांच्या कामाचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे. गरिबांची लेकरं शिकली पाहिजेत हा त्यांचा ध्यास आहे. यासाठी त्यांनी स्वत:कडे असलेली विज्ञानाची पदवी आणि शिक्षकाची नोकरी बाजूला ठेवून मणिुपरी मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:ला झोकून दिलं.२०२१ मध्ये पहिल्यांदा मणिपूरच्या भूमीत पाऊल ठेवलं तेव्हा या देवभूमीतला प्रवास आपलं अख्खं आयुष्य बदलून टाकणार आहे हे अनंत अल्लीशे या ध्येयवेड्या युवकाला माहिती नव्हतं. पण तसं घडलं.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
गरिबाच्या लेकरांचं काय?
मणिपूरच्या पर्वतामधून बराक नदी उगम पावते. तिथल्या अतिदुर्गम भागापासून इम्फाळच्या मैदानी प्रदेशात सलग ३ महिने अल्लीशे यांनी भटकंती केली. भाग नवीन. भाषा वेगळी. लोकजीवन आणि परंपराही अपरिचित. आपल्याच देशातल्या एका अती-दुर्लक्षित भागात फिरताना त्यांच्या मनातली अस्वस्थता सतत वाढतच गेली. त्या भटकंतीत त्यांच्या लक्षात आलं की इथे श्रीमंतांच्या मुलांना शिक्षण आहे, पण गरिबाच्या लेकरांचं काय?

एक विलक्षण प्रवास : मिशन मणिपूर!
आपल्याच देशबांधवांची ही लेकरं शिकली पाहिजेत, म्हणून घरोघर जाऊन पालकांशी बोलून, त्यांची समजूत काढून, त्यांना परोपरीने पटवून पाचवी इयत्तेत शिकणारं एकेक मूल त्यांनी सोलापुरात आणणं सुरू केलं, आणि सुरू झाला एक विलक्षण प्रवास : मिशन मणिपूर! अनंत अल्लीशे दरवर्षी दोन महिने मणिपुरात डोंगरदऱ्या पिंजून काढतात. शिक्षणाबाहेर असलेली मुलं शोधतात. त्यांच्या आईवडिलांच्या अक्षरश: हातापाया पडतात. आपला पोटचा गोळा स्वाधीन करण्याइतपत त्यांचा विश्वास जिंकतात आणि त्यांचं मूल घेऊन सोलापुरात येतात. इथे ज्ञानप्रबोधिनी संस्थेत ही मुलं शिकतात.
"हेच माझं काम, हेच सर्वस्व!"
पूर्व सीमाविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. मणिपुरात आणलेल्या मुलांचा ‘बाबा’ होऊन पदवीपर्यंत त्या मुलांची सोबत करायची जबाबदारी अनंत अल्लीशे यांनी उचलली आहे. दुर्गम भागातली गरिबी, शिक्षणाचा अभाव, सभोवताली व्यसनाधीनता आणि हिंसाचार यातून ही मुलं महाराष्ट्रात सोलापूरमध्ये येऊन शिकतात. स्वत:कडे असलेली विज्ञानाची पदवी आणि शिक्षकी नोकरी बाजूला ठेवून मणिुपरी मुलांच्या शिक्षणासाठी अल्लीशे यांनी स्वत:ला झोकून दिलं. “मुलांनी शिकायला हवं, या पलिकडे मला कुठला ध्यास नाही, माझी कुठली दुसरी इच्छा नाही, माझं कुठलं दुसरं काम नाही. हेच माझं काम, हेच सर्वस्व! असं अनंत अल्लीशे म्हणतात.
लोकसेवा-समाजसेवा कॅटेगरीतील नामांकनं पाहण्यासाठी आणि मत देण्यासाठी इथे क्लिक करा.