राज ठाकरेंना सर्वाधिक टीआरपी, शेलारांनीच दिली आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 15:18 IST2019-04-27T15:01:16+5:302019-04-27T15:18:17+5:30
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा एकाचवेळी सुरु असतांना इलेक्ट्रॉनिक मीडियावर राज यांना प्राधान्य दिले जात असल्याचे अनेकवेळा पहायला मिळाले.

राज ठाकरेंना सर्वाधिक टीआरपी, शेलारांनीच दिली आकडेवारी
मुंबई - राज ठाकरेंच्या भाषणाला वृत्तवाहिन्यांवर किती टीआरपी मिळतो याची आकडेवारीच भाजपच्या आशिष शेलार यांनी भर सभेत दाखवली. शेलारांनी दाखवलेल्या आकडेवारी वरून भाजपला काय साध्य करायचे आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे . राज ठाकरेंनी महाराष्ट्रभर घेतलेल्या सभेत भाजपवर केलेल्या आरोपाला उत्तर देतांना शेलार बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात राज ठाकरे यांनी ६ एप्रिल ते २६ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या. २० दिवसांच्या काळात इलेक्ट्रॉनिक मीडियाने राज यांना २,६०० मिनिटं टीव्हीवर दाखवले. दिवसातून राज ठाकरे १३० मिनिटे झळकायचे तर प्रत्येक तासातील २५ मिनटातून ५ मिनटे राज यांचे दर्शन टीव्हीवर घडत होते, असे शेलार यांनी सांगितले.
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा एकाचवेळी सुरु असताना इलेक्ट्रॉनिक मीडियावर राज यांना प्राधान्य दिले जात असल्याचे अनेकवेळा पहायला मिळाले. राज ठाकरेंना इलेक्ट्रॉनिक मीडियावर किती प्रतिसाद मिळतो याची आकडेवारी शेलार यांनी मांडल्याने शेवटी भाजप पेक्षा राज यांचीच क्रेझ जास्त आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे.
राज ठाकरेंच्या सभेला जमणारी गर्दी आणि त्यांना मिळणारा मोठा प्रतिसाद भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच राज यांना माध्यमात मोठी पसंती मिळत आहे याची आकडेवारीच भाजपच्या आशिष शेलारांनी मांडल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे.