‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 11:37 IST2025-11-20T11:37:02+5:302025-11-20T11:37:38+5:30
Local Body Election 2025: नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी अनेक ठिकाणी उमेदवारही दिले नसल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यावरून आता भाजपाने ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला डिवचले आहे.

‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले
राज्यात सध्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षच एकमेकांविरोधात आमने सामने आलेले दिसत आहेत. तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडी कमालीची विस्कळीत झालेली दिसत आहेत. तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी अनेक ठिकाणी उमेदवारही दिले नसल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यावरून आता भाजपाने ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला डिवचले आहे.
सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला या संदर्भात टोला लगावताना भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, ‘’ना उमेदवार, ना मतदार, कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार ? नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची मुदतही संपली, पण मविआतील घटक पक्षांकडे मैदानात उतरविण्यासाठी उमेदवारच नाहीत’’.
‘’राणा भीमदेवी थाटात लढण्याची घोषणा करणाऱ्या या मविआतील तिन्ही पक्षांना आघाडी करूनसुद्धा अनेक ठिकाणी जिंकण्यायोग्य सोडा, साधा मैदानात उभा करण्याजोगा उमेदवारही मिळत नाहीये. ही इतकी दयनीय अवस्था का होत आहे? आधी लढा तरी… आरोप करण्यासाठी मैदानात उतरावे लागेल, ती लढाईची खरी जागा आहे, असा सल्लाही उपाध्ये यांनी या पोस्टच्या माध्यमातून दिला.