Letter to Raj Thackeray: You must speak, but for your own party and party workers | राज ठाकरेंना पत्र: तुम्ही बोललंच पाहिजे, पण...
राज ठाकरेंना पत्र: तुम्ही बोललंच पाहिजे, पण...

ठळक मुद्देबोलणं ही तुमची ताकद आहे, त्यामुळे तुम्ही बोलत राहिलंच पाहिजे.तुम्ही विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू शकता, अशी कुजबूज ऐकायला मिळतेय.ईडी नोटीसमुळे कार्यकर्ते चार्ज झालेत. आता त्यांना गरज आहे, ती आदेशाची.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे,
स. न. वि. वि.

ईडीची बहुचर्चित चौकशी पूर्ण करून, तब्बल साडेआठ तास अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं देऊन तुम्ही सुखरूप घरी पोहोचलात आणि तिथे 'एक ही मारा, पर सॉल्लीड मारा' टाईप्स एक 'राज'गर्जना करून मनसैनिकांना खूश करून टाकलंत. कितीही चौकशी करा, तोंड बंद ठेवणार नाही, असा इशारा तुम्ही सत्ताधारी भाजपाला, मोदी-शहांना दिलात. तुमच्या आडनावाला आणि स्वभावाला साजेशी अशीच ही प्रतिक्रिया आहे. बोलणं ही तुमची ताकद आहे, त्यामुळे तुम्ही बोलत राहिलंच पाहिजे. पण काय बोललं पाहिजे, कुणासाठी बोललं पाहिजे, याचा एकदा फेरविचार तुम्ही 'मनसे' करायला हवं असं प्रामाणिकपणे वाटतं. तुमचं प्रभावी वक्तृत्व आणि नेतृत्व पाहता, हा सल्ला तुम्हाला आणि तुमच्या सैनिकांना 'शहाणपणा' वाटू शकतो. मात्र शांतपणे (जसा पवित्रा ईडी नोटीसबाबत घेतलात) विचार केल्यास ही 'मन की बात' 'मन(से) की बात' वाटेल, अशी भाबडी आशा वाटते.

पत्राच्या मायन्यात 'मनसे अध्यक्ष' असा उल्लेख मुद्दामच केला आहे. कारण, तुम्ही मनसेची भूमिका मांडताय, की अन्य कुणाची घडी बसवण्याचा प्रयत्न करताय?, असा प्रश्न आज अनेकांच्या मनात आहे. ही शंका तुमच्या भूमिकेमुळेच उद्भवली आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय तुम्ही घेतला होतात, पण प्रचार मात्र अगदी जोमाने केलात. 'लाव रे तो व्हिडीओ' देशभरात गाजलं. हा खटाटोप नेमका कुणासाठी होता?, याचं समर्पक उत्तर मनसैनिकांनाही अजून समजलेलं नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात तुम्ही रान पेटवलंत. यापुढेही तुम्ही त्याच त्वेषानं  हे 'मोदी हटाओ' अभियान राबवाल. ती तुमची, तुमच्या पक्षाची भूमिका असेलही; त्यात गैर काहीच नाही. राजकीय पक्षाचा एक अजेंडा असतोच - असलाच पाहिजे, पण लोकसभेच्या प्रचारावेळी तुम्ही इतरच कुणाचा तरी अजेंडा राबवताय, असं वाटत राहिलं. कारण, मोदी-शहांना हरवण्यासाठी प्रचाराच्या मैदानात तुम्ही लढत होतात, पण तुमचा एकही उमेदवार निवडणूक लढवत नव्हता. कुणाला मत द्या हे तुम्ही जाहीरपणे सांगत नव्हतात, पण ते न समजण्याइतके मतदार खुळे नाहीत. त्यांना मत देणं आपल्या कार्यकर्त्यांना 'मनसे' पटेल का, याचा विचार तुम्ही करायला हवा होतात. त्याऐवजी मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये - जिथे मनसेचा जास्त प्रभाव आहे याची तुम्हाला खात्री होती, अशा ठिकाणी तुमचे चार-सहा शिलेदार रिंगणात उतरले असते तर तुमचा इरादा पक्का आहे याची खात्री झाली असती आणि आज बसलेला शिक्का कदाचित बसला नसता. असंही तुम्ही डझनभर सभा घेतल्यातच, त्यासाठी काही कोटी रुपयांचा खर्च नक्कीच झाला असेल. मग तो आपल्याच उमेदवारांसाठी केला असता, तर तुम्हाला 'शत-प्रतिशत' फायदा होऊ शकला असता. २०१४ मध्ये मोदी लाट असताना, तुम्हीही मोदींच्या बाजूने असताना तुम्ही तुमचे उमेदवार रिंगणात उतरवलेत. त्यांना मतंही चांगली मिळाली. पण, २०१९ मध्ये तुम्ही निवडणुकीपासून लांब राहिलात, हे खरोखरच 'अनाकलनीय' (तुम्हाला जितका लोकसभेचा निकाल वाटतो तितकंच) आहे. 

असो. झालं ते झालं. पण, या अनुभवातून बोध घेऊन तुम्ही विधानसभा निवडणुकीची 'राजनीती' आखाल, असं वाटत असताना तुमचं 'इंजिन' वेगळ्याच दिशेला धावताना दिसतंय. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून तुम्ही विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करताय. पण, विरोधकांच्या एकीचं लोकसभा निवडणुकीत काय झालं आणि आता संसदेत काय होतंय, हे सगळेच बघताहेत. हा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे मांडण्याचा तुमचा निर्णय योग्य होता. पण, त्यांच्याकडून काहीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचं तुम्हीच सांगताय. याआधीही शरद पवार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यापासून सगळ्यांनीच कथित 'ईव्हीएम घोटाळा' पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. पण त्यातून काहीच निष्पन्न झालेलं नाही. मग आता पुन्हा तोच विषय उगाळण्यात कितपत अर्थ आहे? 

उलट, ईव्हीएमच्या विरोधात तुम्ही बोलायला लागल्यापासून एक वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. या मुद्द्यावरून तुम्ही विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू शकता, अशी कुजबूज ऐकायला मिळतेय. त्यामुळे मनसैनिकांमधील संभ्रम वाढलाय. मधल्या काळात पक्षबांधणीच्या दिशेनं सुरू झालेल्या कामाचा वेगही मंदावल्याचं दिसतंय. त्यामुळे ही शंका आणखी बळावलीय. अशा वेळी तुमचं बोलणं खूप महत्त्वाचं आहे. कारण, लाखो कार्यकर्ते आणि शेकडो पदाधिकाऱ्यांचं राजकीय भवितव्य तुमच्या निर्णयावर ठरणार आहे. कार्यकर्ते तर तुमच्यावर जीव ओवाळून टाकायलाही तयार असल्याचं परवा पुन्हा सिद्ध झालंय. त्यांचं शंकानिरसन करण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर बोललं पाहिजे, पुढची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. 

महाराष्ट्र ही माझी सीमा आहे, असं तुम्ही अभिमानानं सांगत आलात. असं असताना, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही आघाडीवर असलं पाहिजे. पण, मनसेचं अजून कशातच काही दिसत नाही. ईडी नोटीसमुळे कार्यकर्ते चार्ज झालेत. ठोस मुद्दाही मिळालाय. आता त्यांना गरज आहे, ती आदेशाची. मोदी-शहांविरोधात लढायचंय, भाजपाला पाडायचंय, हे ठीक आहे. पण मनसे रिंगणात उतरून लढणार की पडद्यामागून?, स्वतःसाठी सभा घेणार की अन्य कुणासाठी?, हे तुम्ही बोलल्याशिवाय कळणार नाही. नरेद्र मोदींना झटका आला आणि त्यांनी नोटाबंदी केली, अशी टीका तुम्ही करता. पण, तुम्हीही शेवटच्या क्षणी कार्यकर्त्यांना 'झटका' देता, असं नाही का वाटत? तुम्ही माना अथवा मानू नका, पण या 'झटक्या'नेच मनसेचं 'इंजिन' ट्रॅकवरून खाली उतरलंय. विधानसभा निवडणुकीत ते रुळावर आणण्याची संधी आहे. फक्त त्यासाठी तुम्ही वेळीच बोललं पाहिजे. अन्यथा मनसैनिकांनाही म्हणावं लागेल, 'अनाकलनीय'! 

जय महाराष्ट्र!

महत्त्वाच्या राजकीय बातम्या

काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते म्हणतात, मोदींना सातत्याने खलनायक ठरवणे चुकीचे 

महाराष्ट्राशी जवळीक असणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधीयांकडे विधानसभेची धुरा

‘ईडी’मुळे राज यांच्या हाती आयते कोलीत; निवडणुकीसाठी मिळाला मुद्दा

सेना-मनसे यांच्यात रंगणार मुख्य लढत, पुनर्विकास हा प्रमुख मुद्दा

Web Title: Letter to Raj Thackeray: You must speak, but for your own party and party workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.