Two senior Congress leaders say, it is wrong to call Modi consistently a villain | काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते म्हणतात, मोदींना सातत्याने खलनायक ठरवणे चुकीचे 
काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते म्हणतात, मोदींना सातत्याने खलनायक ठरवणे चुकीचे 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय आणि केलेल्या प्रत्येक कृतीवर विरोधकांकडून जोरदार टीका होत असते. दरम्यान, काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी नरेंद्र मोदींना सतत खलनायक ठरवणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. नरेंद्र मोदींचा सातत्याने खलनायक असा उल्लेख करून विरोधक त्यांचीच मदत करत आहेत, असे अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे. तर जयराम रमेश यांनी काल असेच वक्तव्या करताना  नरेंद्र मोदींना प्रत्येक वेळी व्हिलन ठरवून त्यांच्यावर टीका करत राहिल्याने काहीही हाती लागणार नाही, असा सल्ला रमेश यांनी दिला होता. 

जयराम रमेश यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत अभिषेक मनु सिंघवी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, मोदींना खलनायकाप्रमाणे सादर करणे हे चुकीचे आहे. ते पंतप्रधान आहेत म्हणून नव्हे तर असे करून विरोध त्यांचीच मदत करत आहेत. काम हे चांगले, वाईट किंवा सामान्य असू शकते. त्यामुळे कामाचे मूल्यांकन हे व्यक्ती नव्हे तर मुद्द्यांच्या आधारावर झाले पाहिजे. उज्ज्वला योजना ही चांगल्या कामांपैकी एक आहे.'' 


दरम्यान, काँग्रेसचे एक ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते जयराम रमेश यांनीही नरेंद्र मोदींना सातत्याने व्हीलन ठरवण्याच्या विरोधकांच्या सवयीवर टीका केली होती. ''पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारचे मॉडेल हे पूर्णपणे नकारात्मक नाही. त्यांनी केलेल्या कार्याचे महत्त्व नाकारणे आणि प्रत्येकवेळी त्यांनी खलनायक म्हणून सादर केल्याने काहीही हाती लागणार नाही. मोदींचे कार्य आणि 2014 ते 2019 या काळात त्यांनी जे काही केले त्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, ज्यामुळे ते पुन्हा सरकारमध्ये परतले आहेत.'' असे रमेश म्हणाले होते. 

राजकीय विश्लेषक कपिल सतीश कोमीरेड्डी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन जयराम रमेश यांनी केलेले. त्यावेळी ते म्हणाले की, ''मोदी जे बोलतात ती भाषा त्यांना लोकाशी जोडते. ते अशी कामे करत आहेत ज्याची जनतेकडून प्रशंसा होत आहे, अशी कामे याआधी झालेली नाहीत. जोपर्यंत हे आम्ही मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा सामना करू शकणार नाही.''   


Web Title: Two senior Congress leaders say, it is wrong to call Modi consistently a villain
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.