Leopard: बिबट्यांच्या दहशतीवर उपाय; ‘नसबंदी’ करणार, गावात सायरन वाजणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:53 IST2025-11-18T13:50:16+5:302025-11-18T13:53:24+5:30
Leopard New: पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leopard: बिबट्यांच्या दहशतीवर उपाय; ‘नसबंदी’ करणार, गावात सायरन वाजणार!
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी बिबट्यांच्या नसबंदीला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे, असे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी सांगितले.
बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष
ठेवण्यासाठी चंद्रपूरच्या धर्तीवर पुणे, नाशिक, अहिल्यानगर येथे एआय यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. तसेच, अत्याधुनिक सॅटेलाइट कॅमेरे बसवले जाणार आहेत. बिबट्या जवळ आल्यास गावांमध्ये सायरनद्वारे तातडीचा अलर्ट देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. वनमंत्री नाईक यांनी पुणे, नाशिक व अहिल्यानगर येथील वनविभागांतील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
सहा महिने अभ्यास करणार
बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नसबंदीचा प्रयोग आवश्यक आहे. सहा महिन्यांत हा प्रयोग किती यशस्वी ठरतो, याचा अभ्यास करून पुढील धोरण ठरविण्यात येईल. जेथे बिबट्या नियंत्रणातच येत नसेल, तेथे त्याला गोळ्या घालण्याचे आदेश आहेत, असेही नाईक यांनी सांगितले. खाततगाव येथे विहिरीत पडलेला बिबट्याने पाइपाचा आधार घेतला होता.
पिंजरे वाढविणार
बिबटे पकडण्यासाठी उपलब्ध असलेले २०० पिंजरे अपुरे असून पिंजऱ्यांची संख्या एक हजार करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात यासाठी ११ कोटींची तरतूद केली आहे. पुणे, जुन्नर विभागात ताडोबाप्रमाणे बांबूची भिंत उभारण्यात येणार आहे. ‘वनतारा’ प्रकल्पात येत्या १० ते १२ दिवसांत काही बिबट्यांना स्थलांतरित केले जाईल, असेही नाईक म्हणाले.