झाडाला मिठी मारता, मग बकरीला का नाही? नितेश राणेंचा पर्यावरणप्रेमींना सवाल; म्हणाले, 'हा भाजपचा कार्यक्रम नाही'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:26 IST2025-12-04T15:26:12+5:302025-12-04T15:26:26+5:30
नाशिकमध्ये साधूग्रामसाठी १८०० झाडांवर कुऱ्हाड पडणार असल्याचे समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे.

झाडाला मिठी मारता, मग बकरीला का नाही? नितेश राणेंचा पर्यावरणप्रेमींना सवाल; म्हणाले, 'हा भाजपचा कार्यक्रम नाही'
Nitesh Rane on Tapovan Trees: प्रयागराज कुंभमेळ्यानंतर सुमारे दीड वर्षांनी नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीने वेग घेतला असताना, नाशिकच्या तपोवन परिसरात तयार करण्यात येणाऱ्या साधूग्राममुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. साधू-महंतांच्या वास्तव्यासाठी सुमारे ११५० एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्याचे नियोजन आहे, ज्यामध्ये तपोवनमधील ५४ एकर महापालिकेच्या जागेचा समावेश आहे. मात्र याच जागेवरील सुमारे १८०० झाडे तोडण्याच्या नोटिशीमुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विरोधकांनीही यावर आक्षेप घेतल्याने कॅबिनेट मंत्री नितेश राणे पर्यावरण प्रेमींना सवाल विचारला आहे.
नाशिक महानगरपालिकेने तपोवनमधील सुमारे १७०० हून अधिक विविध प्रजातींच्या वृक्षांचे पुनर्रोपण आणि काही फांद्यांची छाटणी करण्याबाबत नोटीस काढून नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या होत्या. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होण्याची शक्यता लक्षात येताच केवळ पर्यावरणप्रेमीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनीही शेकडोंच्या संख्येने आक्षेप नोंदवले. या संवेदनशील मुद्द्याने तात्काळ राजकीय वळण घेतले. राज्याचे प्रमुख नेते आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही पर्यावरणप्रेमींच्या बाजूने आवाज उचलला. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि विजय वडेट्टीवार तसेच अजित पवार यांनीही या वृक्षतोडीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत पर्यावरणाचे जतन करण्याचे आवाहन केले.
या वादात कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनीही उडी घेतली. मात्र, त्यांनी या वादाला वेगळी दिशा देत, झाडाला मिठी मारता तशी बकरीला का मिठी मारत नाही? असा सवाल केला. तसेच आपल्या सणांच्या वेळीच असे प्रश्न उपस्थित केले जातात, असेही नितेश राणे म्हणाले.
"बकऱ्यांच्या कत्तलीनंतर रक्ताचे पाणी वाहत असल्याचे अनेकवेळा पाहायला मिळतं. पण तेव्हा पर्यावरणप्रेमी आवाज उठवताना आम्हाला दिसत नाही. व्हर्च्युवल बकरी ईद करा असंही सांगताना दिसत नाही. मग एका धर्माला एक आणि दुसऱ्या धर्माला एक न्याय कशासाठी? झाडाला मिठी मारता चांगली गोष्ट आहे. झाडं जगली पाहिजेत हा पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य मुद्दा आहे. मग झाडाला मिठी मारता तशी बकरीला का मिठी मारत नाही. बकरी प्राणी नाहीये का? तेव्हा प्राणी प्रेमी कुठे असतात हाच माझा प्रश्न आहे. विजय वडेट्टीवार विसरले असतील की ते काँग्रेसचे नेते होण्याआधी हिंदू आहेत. आपल्या सणांच्या वेळी असे प्रश्न विचारले जातात. पण अन्य धर्मांच्या सणांच्या वेळी हे गप्प का? एवढाच प्रश्न विचारला त्यात चूक काय?," असा सवाल नितेश राणेंनी केला.
"तिथे कुंभमेळा होत असल्याने साधूग्रामसाठी तिथे जागा तयार केली जात आहे. झाड तोडणं हा मुद्दा वेगळा आहे. कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. त्याची काही लोकांना अॅलर्जी झालेली आहे. म्हणून कुंभमेळ्याला बदनाम केले जात आहे. इथे भाजप, राष्ट्रवादीचा विषय नाही. हिंदू म्हणून बोलण्यात काय चूक आहे. कुंभमेळा हा भाजपचा कार्यक्रम आहे का? हिंदू समाजाच्या कार्यक्रमावेळीच अचानक प्रश्न विचारले जात असतील, अचानक झाडांना मिठ्या मारल्या जात असतील तर प्रश्न विचारायचा नाही का? बकऱ्या कापता तेव्हा पर्यावरणाची हानी होते. तेव्हा प्रश्न विचारण्याऐवजी हे लोक कुठल्या झाडावर चढलेले असतात," अशी टीका नितेश राणेंनी केली.