कोकण रेल्वेची ‘कार ऑन ट्रेन’ सेवा, आजपासून बुकिंग सुरु; कुठून कुठे धावणार, आरक्षण कालावधी.. वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 16:27 IST2025-07-21T16:26:04+5:302025-07-21T16:27:03+5:30
रस्त्यावरुन वाहन चालवत जाण्याच्या कटकटीतून होणार सुटका

कोकण रेल्वेची ‘कार ऑन ट्रेन’ सेवा, आजपासून बुकिंग सुरु; कुठून कुठे धावणार, आरक्षण कालावधी.. वाचा सविस्तर
रत्नागिरी : कोकणरेल्वे मार्गावर प्रवाशांसाठी ‘कार ऑन ट्रेन’ अर्थात रो-रो सुविधा सुरु हाेत आहे. या सुविधेमुळे आता कार थेट रेल्वेनेकोकणात किंवा गोव्यात नेता येणार आहे. या बहुप्रतिक्षित सेवेसाठी आरक्षणाची प्रक्रिया येत्या २१ जुलै २०२५ पासून सुरू होणार आहे.
कोलाड (महाराष्ट्र) येथून या सेवेला २३ ऑगस्ट २०२५ पासून तर वेरणा (गोवा) येथून २४ ऑगस्ट २०२५ पासून सुरुवात हाेणार आहे. गेली अनेक वर्षे मालाने भरलेले ट्रक रेल्वे वॅगनवरुन वाहून नेणारी रो-रो सेवा यशस्वी ठरली आहे. याच धर्तीवर खासगी चारचाकी वाहनांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे लांब पल्ल्यात कार चालवण्याच्या त्रासातून सुटका होईल.
काय आहे ‘कार ऑन ट्रेन’ सेवा?
कोकण रेल्वे मार्गावर गेली अनेक वर्षे रो-रो मालवाहतूक सेवा सुरू आहे. यामध्ये मालवाहू ट्रक विशेष रेल्वे वॅगनवर ठेवून त्यांची वाहतूक केली जाते. याच सेवेचा विस्तार करत, कोकण रेल्वेने आता खासगी कारची वाहतूक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे लांबच्या प्रवासात कार चालवण्याचा त्रास वाचणार आहे.
कुठून कुठे धावणार ‘कार ऑन ट्रेन’?
ही सेवा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेरणा दरम्यान उपलब्ध असेल. त्यामुळे कोकण आणि गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांचा गाडीत चालवित जाण्याचा त्रास वाचणार आहे.
आरक्षण कालावधी
- २१ जुलै २०२५ पासून सुरू.
- १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत बुकिंग करता येणार.
- ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत सुरू राहणार
कार ऑन ट्रेन सेवा
कार बुकिंगच्या रेल्वेच्या नियमानुसार रो रो सुविधेत ट्रेन ला जोडलेल्या एसएलआर किंवा तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्यामधून फक्त तिघांना प्रवास करण्याची अनुमती दिली जाणार आहे. कारबरोबर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ठरवलेले भाडे मोजावे लागणार आहे.