शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

कोकणात हाहाकार; आजही पावसाचा रेड अलर्ट, रायगडमध्ये दरडीखाली ७२ अडकले?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 5:21 AM

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये जलप्रलय; अनेक शहरे पाण्याखाली; कोल्हापूरला धोक्याची घंटा, डोंगर कोसळून महाडजवळ ३० घरे दबल्याची भीती, कल्याण-बदलापूरमध्ये पूरस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई/ठाणे/रायगड/रत्नागिरी : पावसाचा जोर ओसरल्याचे वाटत असतानाच बुधवारी रात्रीपासून राज्यात अनेक ठिकाणी आभाळ फाटले आणि धो...धो पावसाने हाहाकार उडाला. कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात महापूर आला असून चहूबाजूंनी पुराच्या पाण्याने वेढल्याने चिपळूणची अवस्था भीषण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, संगमेश्वर, राजापूर ही शहरेही पुराच्या विळख्यात अडकली आहेत. पेढे येथे दरड कोसळून ढिगाऱ्याखाली दोघेजण गाडले गेले आहेत. ठाणे जिल्ह्यात कल्याण, बदलापूरमध्ये पूरस्थिती आहे.

रायगड जिल्ह्यात महाडजवळ तळीये गावावर दरड कोसळून ३० घरे दबल्याची शक्यता असून त्याखाली ७१ जण गाडल्याची भीती आहे. पावसामुळे तेथे रात्री उशिरापर्यंत मदत पोहोचू शकली नव्हती. पूरस्थितीमुळे सर्व रस्ते बंद असल्याने एनडीआरएफची टीमही तेथे सहाय्यासाठी जाऊ शकलेली नव्हती. रायगड जिल्ह्यात पुराचा सर्वाधिक तडाखा हा महाड, पोलादपूर आणि कर्जत या तालुक्यांना बसला आहे. बिरवाडीपासून चौदा किलोमीटरवरील तळीये गावावर संध्याकाळीसातच्या सुमारास दरड कोसळली. मात्र नेटवर्क नसल्याने तेथून काहीही माहिती मिळू शकली नाही. एनडीआरएफचे पथही पोहोचू शकले नसल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. तेथे जाणाऱ्या रस्त्यांवर नऊ फुटांपर्यंत पाणी असल्याने ते कमी होताच बोटींतून पोहोचण्याचा प्रयत्न करू, असे एनडीआरएफच्या पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यात भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर तालुक्यात शहरांमध्ये व निवासी भागात आणि झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. कल्याण आणि बदलापूर शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बदलापूर गावाकडे जाणाऱ्या उल्हास नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. बदलापूर - कर्जत रस्ताही पाण्याखाली गेला.     पावसाचे ३६ बळी

- पावसाने कोकणात ५ जणांचा बळी गेला आहे. रत्नागिरीत चिपळूण तालुक्यातील पेढे येथे दरड कोसळून दोघेजण गाडले गेले, तर महिला वाहून गेली. कर्जतमध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला. कोल्हापुरात चंदगड तालुक्यात कडलगे-ढोलगरवाडी दरम्यान पुराच्या पाण्यात दुचाकीस्वार वाहून गेला. तर घुलेवाडी-निट्टूर दरम्यान ओढ्याच्या पुरात एक महिला वाहून गेली आहे. सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यात सातजण वाहून गेले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. मराठवाडा, विदर्भात प्रत्येकी चौघांचा अशा आठ जणांचा बळी गेला. तर ठाणे, पालघरमध्ये ११ जणांचा बळी गेला. 

- अतिवृष्टीने ठाण्यात आठ जणांचा बळी घेतला आहे, तर तीनजण बेपत्ता आहेत. पालघर तालुक्यात अतिवृष्टीत दोघेजण वाहून गेले तर विक्रमगड तालुक्यात एका व्यक्तीला जलसमाधी मिळाली. तानसा नदीला आलेल्या पुरामुळे वसई तालुका जलमय झाला आहे. जव्हारमधील पूरस्थिती आता ओसरली आहे. तर विक्रमगड तालुक्यामध्ये मात्र पावसाने तडाखा दिल्याचे चित्र आहे.

१८ जागी हलवले

- ठाणे जिल्ह्यात पाच हजार ५०० कुटुंबांचे १८ ठिकाणी स्थलांतर करण्यात आले तर रायगड जिल्ह्यात तब्बल ४०० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

- मध्य रेल्वेच्या टिटवाळा-इगतपुरी आणि अंबरनाथ-लोणावळा मार्गावरील भोर आणि थळ घाटात झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन रेल्वे सेवा प्रभावित झाली. 

- बदलापूर वांगणी रेल्वे दरम्यान रूळ पाण्याखाली आल्याने  रेल्वे ठप्प होती.

पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग बंद

रायगड जिल्ह्यातील पुराचे पाणी घुसल्याने मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील उल्हास, पेज, शिलार या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. दामत येथील कौशल्या सोसायटीसमोरील चाळीमध्ये रात्री दीडच्या सुमारास पाणी भरले. यावेळी रुममधून बाहेर पडून पाण्यातून जात असताना इब्राहिम बाबुला मणियार (४० ) व त्यांची मुलगी जोया (७ ) वाहून गेले.  

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात सर्वच नद्या पात्राबाहेर वाहत असल्याने दाणादाण उडाली असून, मदतीसाठी एनडीआरएफची पथके  दाखल झाली आहेत. अनके मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे. कृष्णाही फुगत चालली आहे. अशातच शुक्रवारी सकाळपासून कोयनेतून पाणी सोडले जाणार असल्याने नदीकाठच्या लोकांच्या मनात धडकी भरली आहे.  कोयना धरणातील पाणीसाठा तब्बल १३ टीएमसी वाढला, एवढा प्रचंड पाऊस घाटमाथ्यावर झाला आहे. एनडीआरएफच्या पथकाने चिपळूणमध्ये पोहोचताच मदकार्याला सुरूवात केली असून खेर्डी येथे वीस जणांची सुटका केली आहे.

मुंबई आणि उपनगरांतही मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. कल्याण, उल्हासनगर येथील अनेक घरांमध्ये नदीच्या पुराचे पाणी घुसले होते. बदलापूर येथे रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने पुण्याकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली होती. नाशकात इगतपुरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात ढगफुटी झाली.

एनडीआरएफच्या १८ तुकड्या तैनात

- राज्यातील भीषण पूरपरिस्थिती लक्षात घेता अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ जवानांच्या १८ तुकड्या बचाव व मदत कार्यासाठी तैनात केल्या आहेत. 

- पैकी रत्नागिरी-६, रायगड, कोल्हापूर,  सिंधुदुर्ग, सातारा आणि सांगली प्रत्येकी २ आणि पालघर व ठाणे जिल्ह्यात प्रत्येकी एक तुकड्या रवाना झाल्या आहेत. याचबरोबर स्थानिक तरूणही मोठ्या प्रमाणावर बचावकार्यात गुंतले आहेत.

कोकणात कुठे काय घडले?

- खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर शहरांना पुराचा विळखा. 

- तिघांचा बळी - पेढे येथे दरड कोसळून दोघे गाडले, एक महिला वाहून गेली. 

- करूळ आणि भुईबावडा घाट बंद असल्याने गगनबावडा मार्गे कोल्हापूरचा संपर्क तुटला.

- महाड शहराला पुराचा विळखा, मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद

नाशिक

इगतपुरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात ढगफुटी. कसारा घाटात दरडी कोसळल्याने मुंबई-नाशिक रेल्वेमार्ग तब्बल १५ तास ठप्प.

कोल्हापूर, साताऱ्यात दाणादाण 

- कोल्हापुरात पंचगंगा धोका पातळीच्या दिशेने : १०३ बंधारे पाण्याखाली : एनडीआरएफ दाखल, अनके मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने जनजीवन विस्कळीत.

- घाटमाथ्यावर पावसाचे थैमान,  कोयना धरणात ३३ तासांत तब्बल १३ टीएमसी पाणीसाठा वाढला, आजपासून होणार विसर्ग. चांदोली धरणाचे दोन दरवाजे उघडले, वारणेला पूर.

- विदर्भातही सर्वदूर पावसाचा जोर आहे. वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील पोथरा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला, तर लालनाला प्रकल्पाची पाच दारे उघडण्यात आली. पुरात शेतकरी व एक महिला मजूर असे दोघे वाहून गेले.

- राजुरा (जि. चंद्रपूर) तालुक्यातील भेदोडा येथील चंदू बिल्लावार (५५) हा शेतकरी गावाजवळील नाल्यावर आलेल्या पुरात दुचाकीसह वाहून गेला.   

- बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे घराची भिंत पडून ७२ वर्षीय विठोबा कचरू जाधव यांचा मृत्यू झाला. 

- अकोला जिल्ह्यात अकोला, बार्शीटाकळी, बाळापूर व पातूर या चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, उमरखेड तालुक्यात पावसाचा मोठा फटका बसला आहे.

- मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलात ढगफुटीप्रमाणे मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे सिपना नदीला पूर आला.

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

- अतिवृष्टीमुळे विशेषत: रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक घेऊन आढावा घेतला. 

- आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून असून संपूर्ण प्रशासन मदतीसाठी उतरले आहे.

पंतप्रधानांशी केली चर्चा

पूर परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्य शासनामार्फत केल्या जात असलेल्या बचाव कार्य आणि उपाययोजनांची माहिती दिली. राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले.

गोव्यात पूरस्थिती-रेड अलर्ट जारी

पणजी : मुसळधार पावसामुळे गोव्यात पूरस्थिती निर्माण झाली असून, नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. शापोरा, वाळवंटी, साळ नदीची पातळी वाढली आहे. आभाळात जमिनीपासून अवघ्या सात किलोमीटरवर ढग दाटले. त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला.

टॅग्स :Rainपाऊसchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाRatnagiriरत्नागिरीkolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र