अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:48 IST2025-10-18T11:47:43+5:302025-10-18T11:48:58+5:30
भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन बैठक झाली. कृषीचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते.

अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार
पुणे : ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम महत्त्वाचा आहे. सध्या धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना यावर्षी पाण्याची टंचाई भासणार नाही. त्यामुळे यंदा रब्बी पिकाखालील क्षेत्र ६५ लाख हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामाचे नियोजन अधिक सक्षम व समन्वित पद्धतीने करून शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा सूचना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाला दिल्या.
भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन बैठक झाली. कृषीचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते.
हरभरा, गव्हाचे पीक भरघोस येणार
भरणे म्हणाले, “राज्यात दरवर्षी सरासरी ५७ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड होते. यावर्षी अतिवृष्टीमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे रब्बी पिकाखालील क्षेत्र ६५ लाख हेक्टरपेक्षा अधिक होण्याचा अंदाज आहे. त्यापैकी सुमारे तीस लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर हरभरा व गव्हाची पेरणी होईल.
बियाणे, खतांची चिंता सोडा
रब्बी हंगामात ११ लाख २३ हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. प्रत्यक्षात १४ लाख ५८ हजार क्विंटल बियाणे शिल्लक आहे. केंद्र सरकारकडून ३१ लाख ३५ हजार टन खते मिळणार आहे. राज्यात सध्या १६ लाख १० हजार टन खत उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे ‘राष्ट्रवादी’ची यंदा काळी दिवाळी : शरद पवार
बारामती : मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची दानत नाही. त्यामुळे आमच्या पक्षाला राज्यभरात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी खंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गोविंदबाग निवासस्थानी व्यक्त केली.