रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 06:39 IST2025-05-10T06:38:59+5:302025-05-10T06:39:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : ‘ ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताकडून पाकिस्तानवर हल्ला चढविला जात आहे. त्याअनुषंगाने लष्कराच्या सर्व दलाच्या सुट्या ...

रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताकडून पाकिस्तानवर हल्ला चढविला जात आहे. त्याअनुषंगाने लष्कराच्या सर्व दलाच्या सुट्या रद्द केल्या. त्याप्रमाणे आरोग्य विभागालाही सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. डॉक्टर, कर्मचाऱ्यांना सुट्या देऊ नयेत, सुटीवरील अधिकाऱ्यांना कर्तव्यावर हजर होण्यास सांगा. प्रत्येक रक्तपेढीत मुबलक रक्तसाठा उपलब्ध ठेवा, अशा सूचना आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह यांनी आरोग्य विभागातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
औषधांचीही कमतरता भासू देऊ नका
रक्तसाठ्याबरोबरच सर्वच संस्थांमध्ये औषधी मुबलक ठेवा. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह आयसीयू कक्ष सज्ज ठेवा. राष्ट्रीय आरोग्य अभियान, आयुषसह इतर सर्व विभागांनाही सतर्क राहण्याच्या सूचना सचिवांनी दिल्या आहेत.
शुक्रवारी आरोग्य सचिव वीरेंद्र सिंह यांनी ऑनलाइन बैठक घेतली. यात लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संचालक, उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता, जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
सचिवांनी काढले परिपत्रक
शासनाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांनीही सायंकाळच्या सुमारास परिपत्रक काढून काही सूचना केल्या. यात सर्व आरोग्य संस्था या पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवाव्यात, सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यावर हजर असावेत, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहने सर्व आवश्यक जीवनरक्षक प्रणालींसह उपलब्ध असावीत.
स्ट्रेचर, अभिकर्मक, ऑक्सिजन आणि इतर जीवनरक्षक प्रणालींची तसेच बेडची उपलब्धता सुनिश्चित करावी. फिरते वैद्यकीय पथक सक्षमपणे कार्यान्वित करावे, सर्व आरोग्य किट, अतिरिक्त डिस्पोजेबल वस्तूंसह शस्त्रक्रिया गृह कार्यान्वित ठेवावे, प्रयोगशाळा संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवाव्यात.
आवश्यकतेप्रमाणे मॉक ड्रिल घेण्यात यावे. ब्लॅक आऊट झाल्यास आरोग्य संस्थेची आपत्कालीन सेवा चालू राहतील. मात्र, ब्लॅक आऊट पाळण्यासंबंधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाप्रमाणे उचित कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले आहेत.