कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 10:42 IST2025-11-20T10:41:09+5:302025-11-20T10:42:09+5:30
Kankavali Nagar Panchayat Election: कणकवलीमध्ये खासदार नारायण राणेंचे पुत्र आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी थेट स्थानिक आघाडीतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत असलेल्या ठाकरे गटाच्या नेत्याला पाठिंबा जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे.

कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर सध्या वेगवेगळी समीकरणं जुळताना दिसत आहेत. त्यात कुठे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये मतभेद झाल्याचे दिसत आहे, तर कुठे परस्परांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष आणि नेते एकत्र आलेले दिसत आहेत. राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या कोकणातील कणकवली नगर पंचायतीच्या निवडणुकीतही अशाच नाट्यमय घडामोडी घडत असून, येथे खासदार नारायण राणेंचे पुत्र आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी थेट स्थानिक आघाडीतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत असलेल्या ठाकरे गटाच्या नेत्याला पाठिंबा जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे.
कणकवली नगर पंचायतीच्या निवडणुकीत यावेळी मंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत स्थानिक शहर विकास आघाडी स्थापक केली आहे. तसेच या आघाडीने नगराध्यक्षपदासाठी ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या शहर विकास आघाडीमध्ये ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटासह शिवसेना शिंदे गटही सहभागी झाला आहे. तसेच शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी बुधवारी रात्री या राजन तेली यांच्या घरी झालेल्या बैठकीला उपस्थित राहत ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे यावेळी कणकवली नगर पंचायतीच्या निवडणुकीत राणे विरुद्ध राणे असा संघर्ष होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
ठाकरे गटाची साथ सोडत हल्लीच शिंदे गटात आलेल्या राजन तेली यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीवेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर, सतीश सावंत यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार निलेश राणे यांनी जोरदार भाषण केले. आम्ही युती करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना आमच्यासोबत युती करायची नव्हती. ज्यांना आमच्यासोबत युती करायची होती, त्यांच्यासोबत युती झाली आहे. नारायण राणे हे युतीसाठी आग्रही होते. मात्र आता युती होईल, असं वाटत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या शिवसेनेचं काम करा, असं त्यांनी आम्हाला सांगितलं, असे निलेश राणे म्हणाले.
समोर आपलेच लोक आहेत. मात्र ते आपलेच असलीत तर समोर का उभे आहेत? आता या शहर विकास आघाडीवर टीका केली जाईल, आरोप होतील, पैसे वाटले जातील. पण गुलाल आपणच उधळायचा, फटाकेही आपणच फोडायचे, असे सांगत निलेश राणे यांनी विजयाबाबत विश्वास व्यक्त केला.