४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:51 IST2025-10-06T12:30:12+5:302025-10-06T12:51:10+5:30
रॉक्सस्टारला एकदा साडे सहा कोटी दिले, दुसऱ्यांदा १० कोटी दिले. दुसरीकडे २० हजार मानधनावर असलेल्या पीएला साडे सात कोटी कर्ज दिले असा आरोप तेली यांनी केला.

४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
सिंधुदुर्ग - दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या राजन तेली यांनी ४ दिवसांतच महायुतीतील नेत्यावर गंभीर आरोप केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्ज घोटाळ्यामागील सूत्रधार पालकमंत्री नितेश राणे हे आहेत असा आरोप तेली यांनी केला.
याबाबत व्हिडिओ जारी करत राजन तेली यांनी म्हटलं की, राजन तेली सीबीआयच्या जाळ्यात अशी बातमी समोर आली. मात्र ही बातमी खोटी आहे. याचा खुलासा करण्यासाठी मी समोर आलो आहे. मला आजपर्यंत कुठलेही पत्र मला आले नाही. या चौकशीचं मी स्वागत करेन कारण त्यातून दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल. मी गेली ७-८ महिने बँकेचे गैरव्यवहार आणि कर्ज घोटाळ्यावर बोलतोय. रॉक्सस्टार ही कंपनी हिला कर्ज देण्यात आले. हे बाहुले नितेश राणे यांचे आहे. पालकमंत्री नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली बँक चाललीय, या सर्व घोटाळ्यामागे ते आहेत असं त्यांनी म्हटलं.
तसेच रॉक्सस्टारला एकदा साडे सहा कोटी दिले, दुसऱ्यांदा १० कोटी दिले. दुसरीकडे २० हजार मानधनावर असलेल्या पीएला साडे सात कोटी कर्ज दिले. दाभोळच्या जागेवर तिथल्या स्थानिकांचा विरोध आहे. तिथे असणाऱ्या आरोपीला त्याच्या नावाने ५-५ कोटींची कर्ज दिली आहेत. हा घोटाळा बाहेर येऊ नये, मी केलेल्या तक्रारी दडपल्या जाव्यात यासाठी राजकीय सूडाने मला अडकवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. माझ्यावर जी थकबाकी होती, ती सगळी मी भरलेली आहे. या प्रकरणी शासनाने लक्ष घालावे. ही बँक टिकली पाहिजे. कोकणात सहकारी क्षेत्र टिकले पाहिजे. जे भूमाफिया आहेत ते पालकमंत्री नितेश राणेंचे सगळीकडे बॅनर लावतात. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन योग्य न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी राजन तेली यांनी केली.
दरम्यान, ९०० कोटी साखर कारखान्यांना दिले, त्यातील काही कारखाने बंद आहेत, काही सुरू आहेत. त्यांचे आर्थिक व्यवहार न तपासता कर्ज दिली. सिंधुदुर्ग सहकारी जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची, मच्छिमारांची आहे. मी आठवडाभरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून जिल्हा बँकेत ज्या अडचणी आणि घोटाळे झालेत त्याबद्दल दाद मागणार असल्याचं शिंदेसेनेचे नेते राजन तेली यांनी सांगितले.