कानोकान खबर नाही! आव्हाडांनी मध्यरात्री नार्वेकरांचे घर गाठले; स्मार्ट खेळी खेळली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 10:48 IST2023-07-03T10:47:44+5:302023-07-03T10:48:53+5:30
Ajit Pawar Jolt to Sharad pawar NCP News:

कानोकान खबर नाही! आव्हाडांनी मध्यरात्री नार्वेकरांचे घर गाठले; स्मार्ट खेळी खेळली...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अजित पवार यांच्यासह आमदार फुटणार याची खबर लागताच भाजपा आणि अजित पवारांनी घाईघाईने उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी उरकून घेतला. अजित पवारांनी आपल्यासोबत ४२ आमदार असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात शपथविधीला ३० आमदारच उपस्थित राहू शकले होते. आज देवगिरीवर आमदारांची बैठक बोलविण्यात आली आहे. तत्पूर्वी शरद पवारांच्या सल्ल्याने नवे विरोधी पक्षनेते आणि प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी रातोरात कोणाला कानोकान खबर होऊ न देता अचानक विधान सभा अध्यक्षांचे निवासस्थान गाठले.
शरद पवार आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सरसावले आहेत. पवारांची पत्रकार परिषद होत नाही तोच तिकडे विरोधी पक्षनेते पदाची घोषणा करण्यात आली. तसेच आव्हाडांना प्रतोद पदही देण्यात आले. परंतू, राष्ट्रवादीचे आधीचे प्रतोद हे अजित पवारांसोबत असल्याने वेगवान हालचाली करणे गरजेचे होते. आव्हाड यांनी गाफिल न राहता रातोरात राहुल नार्वेकरांचे घर गाठले.
सुमारे दीड वाजता आव्हाडांनी विरोधी पक्षनेता आणि प्रतोद पदाचे पत्र घेऊन ते नार्वेकरांकडे सोपविले आणि त्यावर सही, शिक्काही घेतला. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केले तेव्हा जो कायदेशीर पेच निर्माण झाला होता तसाच पेच आता होऊ नये यासाठी शरद पवारांनी काळजी घेतल्याचे दिसून आले आहे. एकीकडे कायदेशीर लढाई लढणार नाही अशी घोषणा पवारांनी केली आहे, परंतू दुसरीकडे अजित पवारांसह ज्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी राष्ट्रवादी करत आहे. यामुळे लागलीच प्रतोद बदलण्याची तयारी पवारांनी केली आहे.
आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यापूर्वी अजित पवारांनी समर्थक आमदारांची बैठक बोलावली आहे. तर शरद पवार हे साताऱ्याला निघून गेले आहेत. तिथे ते यशवंतराव चव्हान यांच्या स्मारकाला अभिवादन करून कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. सुप्रिया सुळे मुंबईत आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील मुंबईत आहेत. शरद पवारांनी दोन तीन दिवसांत आमदारांनी जनतेची माफ मागावी, तरच माझा विश्वास बसेल असे म्हटले आहे. यामुळे आता राजकारणाचा पुढचा अंक पहायला मिळणार आहे. शरद पवार पुन्हा एकदा आमदारांना आणण्यात यशस्वी होतात की नाही हे देखील समजणार आहे.
जितेंद्र आव्हाडांनी कार्यकर्त्यांना रोखले...
राष्ट्रवादीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी जे नेते भाजपासोबत गेले त्यांच्या फोटोंना काळे फासले होते. आव्हाडांनी कार्यकर्त्यांना थांबवत स्वत: या फोटोवरील काळे फुसले आहे.