"आम्ही XXX झालोय..." राज ठाकरेंच्या विधानावर जितेंद्र आव्हाडांनी ऑन कॅमेरा काय केले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 13:16 IST2025-03-10T13:15:19+5:302025-03-10T13:16:07+5:30
भारतात प्रत्येकाला त्यांचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. किंबुहुना मी राज ठाकरेंचं अभिनंदन करेन. अशाप्रकारे हिंमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. आपल्या मनातलं बोलायला हिंमत लागते असं त्यांनी म्हटलं.

"आम्ही XXX झालोय..." राज ठाकरेंच्या विधानावर जितेंद्र आव्हाडांनी ऑन कॅमेरा काय केले?
मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावरून गंगा नदीच्या अस्वच्छतेवर भाष्य केले. राज यांच्या विधानावरून भाजपासह शिवसेनेसारख्या संघटनांनी आक्षेप घेत त्याचा समाचार घेतला. मात्र राज ठाकरे जे बोलले, ते बोलायला धाडस लागते, आम्ही XXX झालोय, षंढ झालोय, हे बोलायलाही घाबरतो, नको आपल्या मागे लागतील परंतु राज ठाकरे जे बोलले त्यांना सलाम असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी त्यांचं कौतुक केले.
राज यांच्या विधानावर माध्यमांनी जितेंद्र आव्हाडांना प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी जितेंद्र आव्हाडांनी राज यांची मिमिक्री करत म्हणाले की, राज ठाकरेंनी जे विधान केले, जी नकल केली ते आम्ही केले असते तर आतापर्यंत आमच्या घरावर मोर्चे, दगडफेक झाली असती. आम्ही देशद्रोहीही ठरलो असतो. राज ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केले. भारतात प्रत्येकाला त्यांचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. किंबुहुना मी राज ठाकरेंचं अभिनंदन करेन. अशाप्रकारे हिंमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. आपल्या मनातलं बोलायला हिंमत लागते असं त्यांनी म्हटलं.
तसेच आम्ही कदू, XXX, षंढ झालोत, आम्ही हे बोलायलाही घाबरतो, नको नको उगाच आपल्या मागे लागतील. राज ठाकरे मनात आहे ते बिनधास्त बोललेत. ते बोलले ते अनेक भारतीयांच्या मनात आहेत. राज ठाकरेंच्या डेरिंगला माझा सलाम आहे. बाकी मला यात काही बोलायचे नाही असं जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया देत सॅल्यूट देतानाची अॅक्शन माध्यमांसमोर केली.
राज ठाकरे मविआत सहभागी होणार?
दरम्यान, राज ठाकरे मविआत सहभागी होणार का या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना खोचक टोला लगावला. तुम्ही स्वप्नरंजन करत राहावे, पत्रकाराचं काम स्वप्न पाहणे हे आहे. तुमच्या स्वप्नावरच महाराष्ट्र चालतो, तुम्ही स्वप्न पाहात राहा. परंतु राज ठाकरे यांनी जे विधान केले, ते करण्याची हिंमत दाखवली त्यासाठी राज ठाकरेंना मानाचा मुजरा असं आव्हाडांनी सांगितले.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मनसेचा वर्धापन मेळावा पिंपरी चिंचवड येथे पार पडला. त्यात राज ठाकरे म्हणाले की, कुंभमेळ्याला जाऊन आल्यावर बाळा नांदगावकर यांनी मला कमंडलूमधील पाणी दिले. ते म्हणाले, पिणार का? मी नाही म्हटले. देशातील एकही नदी स्वच्छ नाही, तरीही आम्ही नदीला माता म्हणतो. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही असं परखड मत त्यांनी व्यक्त केले.