पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 06:31 IST2025-07-18T06:29:26+5:302025-07-18T06:31:09+5:30

Jitendra Awhad- Gopichand Padalkar Clash: विधानभवनात राडा : कायदेमंडळाच्या मंदिराला काळा डाग, कारवाई कधी...

Jitendra Awhad- Gopichand Padalkar row Vidhan Sabha : A brawl broke out in the lobby between Padalkar-Awhad party workers, abuse was exchanged in the language of 'M'-'Bh' | पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जनतेच्या भल्याचे कायदे करणारे कायदेमंडळाचे मंदिर गुरुवारी डागा‌ळले. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या आवारातच एकमेकांना भिडले. कार्यकर्ते गावगुंडांप्रमाणे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. कॉलर धरत ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ करीत एकमेकांना गुद्दे मारले. कपडे फाडले. कायदे करणाऱ्यांच्याच साक्षीने असे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले. यापूर्वी विधानभवनात कधीही न घडलेल्या या घटनेने लोकशाहीची मान शरमेने खाली गेल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे. 

मागील आठवड्यात विधानभवनात आव्हाड यांनी पडळकरांना ऐकू जाईल अशा आवाजात ‘मंगळसूत्र चोर’ म्हटले हाेते. बुधवारी पडळकर यांनी आव्हाडांना विधानभवन प्रवेशद्वारावर शिवीगाळ केली होती. त्याच रागातून दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडल्याचे सांगितले जाते.

काय घडले, कसे घडले?

संध्याकाळी ५.३० च्या सुमारास विधानभवनाच्या तळमजल्यावर आव्हाड समर्थक नितीन देशमुख उभे होते. तिथे जवळच पडळकर समर्थक हृषीकेश टकलेही होते. देशमुख हे आव्हाडांचे समर्थक असल्याचे टकले यांना समजल्यावर ते शिवीगाळ करत देशमुखांच्या अंगावर धावले. 

दोघांमध्ये बाचाबाची होऊन प्रकरण हाणामारीवर आले. टकलेने देशमुख यांच्या शर्टाची कॉलर पकडून त्यांना मारायला सुरुवात केली. सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत दोघांना बाजूला केले. मारहाण होत असताना त्याचे मोबाईलवर व्हिडीओ चित्रीकरण झाले.
सुरक्षा रक्षकांनी टकले आणि देशमुख यांना ताब्यात घेतले आहे. सुरक्षा रक्षक त्यांची चौकशी करत असतानाच टकलेला सुरक्षा रक्षकांनी तंबाखू मळून दिल्याची तक्रार आव्हाड आणि जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. 

टकले पोलिसांच्या रडारवर : शिव मल्हार क्रांती सेनेचा जिल्हाध्यक्ष असलेला ऋषिकेश ऊर्फ सर्जेराव बबन टकले (रा. माळवाडी, ता. पलूस, जि. सांगली) याच्याविरूद्ध २०१६ ते २०२१ या कालावधीत सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच, त्याच्याविरूद्ध झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती.

अहवाल येताच कारवाई करणार : नार्वेकर
विधिमंडळ परिसरात घडलेली घटना दुर्दैवी आहे. मी अहवाल मागवला असून ⁠उद्या अहवाल मला मिळेल आणि मी कारवाई करणार आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले. 

पडळकरांकडून दिलगिरी
हा प्रकार झाल्यानंतर पडळकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांसमोर येत पडळकर म्हणाले, विधानभवनाच्या प्रांगणात जी घटना घडली ती दुर्दैवी आहे, त्याचे अतीव दुःख मला आहे. विधानभवन अध्यक्ष आणि सभापतींच्या अखत्यारित विधानभवन आहे, मी दिलगिरी व्यक्त करतो.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला मारण्याचे षडयंत्र 
विधानसभेतील भाषण आटोपून मी बाहेर पडलो आणि गाडीतून बाहेर निघून गेलो, मला फोन आला नितीन देशमुखला मारले. परत आल्यानंतर व्हिडिओ बघितला. त्यांचे नियोजन मला मारण्याचे होते. सगळे खून, दरोड्यातील मोक्काचे आरोपी आहेत. मोक्कातील आरोपी विधानभवनात येतात आणि हल्ला करतात. मी बाहेर गेलो नसतो तर नितीन देशमुखच्या जागी मी असतो. 

कडक कारवाई करावी
ही अतिशय चुकीची घटना आहे. अशा प्रकारे इथे घटना घडणे योग्य नाही. विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या अंतर्गत विधानभवन परिसर येतो, त्यामुळे अध्यक्ष आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि कडक कारवाई करावी, अशी विनंती मी त्यांना केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात हे विधानभवनाला शोभणारे नाही.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Web Title: Jitendra Awhad- Gopichand Padalkar row Vidhan Sabha : A brawl broke out in the lobby between Padalkar-Awhad party workers, abuse was exchanged in the language of 'M'-'Bh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.