“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 17:45 IST2025-07-15T17:44:59+5:302025-07-15T17:45:20+5:30

NCP SP Group Jayant Patil News: आम्ही २५ वर्षे या पक्षात आहोत. मी मुख्य सेनापती होतो, मी जातो आहे, एक पाऊल मागे घेतले आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

jayant patil resigns as state president of ncp sharad pawar group and said have not taken a single vacation in 7 years | “२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील

“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील

NCP SP Group Jayant Patil News: मी २६३३ दिवस पक्षाचा अध्यक्ष आहे. माझे सगळे सहकारी गेले तरी शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ रहाण्याचा निर्णय घेतला. ७ वर्षे एकही सुट्टी न घेता आपण पक्षासाठी काम केले. बायकोलाही तसे सांगितले. दोन खासदार असलेला भाजपा मोठा होऊ शकतो तर, १० आमदार असलेला आपला पक्ष मोठा का होऊ शकत नाही, असा सवाल करत जयंत पाटील यांनी आपले मनोगत मांडले.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुंबईतील राज्य कार्यकारिणीची बैठकीत शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली.  अनिल देशमुख यांनी नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली. यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकाळाबाबत विचार मांडले.

मी जातो आहे, एक पाऊल मागे घेतले आहे, पण...

मी मुख्य सेनापती होतो, सेना अजूनही सज्ज आहे. नव्या युगातही शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार हाच आमचा ध्यास आहे. मी जातो आहे, पण सोडत नाही. एक पाऊल मागे घेतले आहे, पण उद्दिष्ट अजूनही ठाम आहे. कालही महाराष्ट्रासाठी होतो, आजही आहे, नाव असेल किंवा नसेल, पण कामातूनच ओळख मिळेल, कारण मी जयंत आहे, असे सांगत जयंत पाटील यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. तसेच माझी कोणतीही संघटना नाही, मी वेगळा गट केला नाही. वेगळे फाउंडेशन काढले नाही, असले पाप कधीही केले नाही. शरद पवार जो निर्णय देतील तो आम्ही स्वीकारला, आम्ही २५ वर्षे या पक्षात आहोत. शरद पवार यांनी निर्णय घेतलेला असतो, तो बराच विचार करून निर्णय घेतला असतो, असे जयंत पाटील म्हणाले.

शरद पवार यांचा निर्णय मी नेहमीच अंतिम मानला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यापासून २०१९ ची लोकसभा-विधानसभा निवडणूक, २०२४ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीचा उल्लेख होता. जयंत पाटील म्हणाले की, याआधी पक्षात नेत्यांच्या मुलांनाच पदे मिळाली पण ही प्रथा मोडून काढत आम्ही मेहबूब शेख, सक्षणा सलगर, सुनील गव्हाणे अशा सामान्य घरातील तरुणांना संधी दिली. शून्यातून लोकांना उभे करून त्यांना ताकद देण्याच काम शरद पवार यांनी केले. त्यांचा सारखा काम करणारा दुसरा नेता कोणी नाही असे सांगत असतानाच मी गेल्या २५ वर्षांपासून या पक्षात काम करत आहे. शरद पवार यांचा निर्णय मी नेहमीच अंतिम मानला आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे काही नाही असे म्हणत त्यांनी सर्वच चर्चांना विराम दिला. 

एकंदरीत काय तर सरकार दिलेला शब्द पाळण्यास असमर्थ

सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य टिकवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. संपूर्ण राज्यात आज धर्मांधतेचे विष पेरले जात आहे, महिलांवर अत्याचार वाढला आहे, विकासाच्या आडून भ्रष्टाचार होत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अधोगतीकडे नेला जात आहे. आज जगाचा पोशिंदा असणारा आपला शेतकरी हवालदिल झाला आहे, त्यांच्या वर दुबार पेरणीचे संकट कुठे अतिवृष्टीमुळे तर कुठे दुष्काळ आहे. मागील मदतच अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही. लातूर मध्ये तर शेतकऱ्यांनी स्वतः जुंपून घेतले असे महाराष्ट्रात कधीच पाहिले नव्हते. ६ महिन्यांमागे राज्यातील लोकांनी जे आश्वासन डोळ्यापुढे ठेऊन मतदान केले त्यातील एकही आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार होता, लाडक्या बहिणींना २१०० मिळणार होते, युवकांना नोकरी मिळणार होती, विकासकामांना निधी मिळणार होता पण अद्याप काहीच नाही. एकंदरीत काय तर हे सरकार दिलेला शब्द पाळण्यास असमर्थ ठरत आहे. 

दरम्यान, सामान्य माणसाचा थेट संपर्क शरद पवारांसोबत झाला. त्यावेळी परिवार संवाद यात्रा काढण्यात आली होती. ७ हजार ६०० किमी आम्ही प्रवास आम्ही केला होता. जिथे आम्ही निवडणुका लढत नव्हतो, तिथेही आम्ही पोहोचलो. शरद पवार यांचे नाव घेतले की, महाराष्ट्रात कोणत्याही गावात ५० कार्यकर्ते सहज मिळतात, असे जयंत पाटील यांनी नमूद केले.  तसेच जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर टीका केली. विधानसभा निवडणूक खूप ताकदीने लढवली पण त्यात आपल्याला पाहिजे तसे यश प्राप्त नाही झाले, असे का झाले? तर या मॅचचा अंपायर आधीच फिक्स झाला होता. स्टंपला बॉल लागून विकेट गेली तरी अंपायरने नो बोल दिला असे ते म्हणाले. आपला पक्ष गोर-गरीब माणसांचा आहे, शेतकरी कष्टकरी लोकांचा आहे आणि जनसामान्यांचा आहे. हा पक्ष पवार साहेबांचा आहे आणि या पक्षात प्रत्येक माणसाला पवार साहेबांशी थेट बोलण्याचा संपर्क करण्याचा अधिकार आहे. आपला पक्ष नेहमी लोकशाही पद्धतीने चालला आहे आणि तो पुढे ही तसाच चालला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली.

"हा शेवट नाही — एका नव्या पर्वाची सुरुवात आहे,
नवीन नेतृत्वातसुद्धा जुन्या निष्ठेचीच खरी बात आहे.
मी फक्त एक मुख्य सेनापती होतो, सेना अजूनही सज्ज आहे,
नव्या युगातही ‘शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार' हाच आमचा ध्यास आहे."

"मी जातो आहे, पण सोडत नाही,
एक पाऊल मागे घेतलंय, पण उद्दिष्ट अजूनही ठाम आहे.
कालही महाराष्ट्रासाठी होतो, आजही आहे,
नाव असेल किंवा नसेल — पण कामातूनच ओळख मिळेल, कारण मी 'जयंत' आहे.”

 

Web Title: jayant patil resigns as state president of ncp sharad pawar group and said have not taken a single vacation in 7 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.