जयंत नारळीकर यांचा शाहू पुरस्काराने झाला होता सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 13:19 IST2025-05-21T13:19:38+5:302025-05-21T13:19:52+5:30
नारळीकरांचे मूळ घराणे भुदरगड तालुक्यातील पाटगावचे. परंतु पूर्वज आले आणि कोल्हापुरात महाद्वार रोडवर स्थायिक झाले. या ठिकाणचा नारळीकर वाडा पाडून काही वर्षांपूर्वी या ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात आले.

जयंत नारळीकर यांचा शाहू पुरस्काराने झाला होता सन्मान
कोल्हापूर : येथे जन्मलेले आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी त्यांचा २००० मध्ये शाहू स्मारक ट्रस्टच्या राजर्षी शाहू पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. डॉ. नारळीकर यांच्या निधनानंतर शहरामध्ये त्यांच्या आठवणी जागविण्यात येत आहेत.
नारळीकरांचे मूळ घराणे भुदरगड तालुक्यातील पाटगावचे. परंतु पूर्वज आले आणि कोल्हापुरात महाद्वार रोडवर स्थायिक झाले. या ठिकाणचा नारळीकर वाडा पाडून काही वर्षांपूर्वी या ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात आले. त्यालाही ‘नारळीकर भवन’ असे नाव देण्यात आले आहे. त्यांचे आजोळही कोल्हापुरातीलच. शंकर आबाजी हुजूरबाजार हे त्यांचे आजोबा. नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी येथील दाभोळकर नर्सिंग होममध्ये झाला. परंतु त्यांचे सर्व शिक्षण बनारस विद्यापीठ आणि अन्य ठिकाणी झाले.
खगोलशास्त्रामध्ये भरीव कामगिरी करणारे डाॅ. नारळीकर यांच्या कामाची दखल घेऊन सन २००० सालचा शाहू पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला होता. यानंतर ११ नोव्हेंबर २००६ रोजी त्यांनी पाटगाव येथे पत्नी मंगला यांच्यासह भेट देऊन पूर्वजांविषयी माहिती घेतील होती. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागवण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या शाळेतील मुलांशी केशवराव भोसले नाट्यगृहात त्यांनी संवाद साधला होता. यावेळी अरुण नाईक आणि विनायक पाचलग यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली होती. शिवाजी विद्यापीठातही त्यांची व्याख्याने झाली होती.