जालना: मजूर झोपलेल्या शेडवरच टाकली टिप्परमधील रेती; पाच मजुरांचा वाळूखाली दबून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 09:24 IST2025-02-22T09:21:29+5:302025-02-22T09:24:49+5:30

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यामध्ये पासोडी गावात वाळूखाली दबून पाच मजुरांचा मृत्यू झाला. मजूर झोपलेल्या पत्र्याच्या शेडवरच टिप्पर चालकाने वाळू टाकल्याने ही दुर्दैवी घटना घडली.

Jalna: Sand from a tipper was dumped on the shed where the laborers were sleeping; Five laborers died after being buried under the sand | जालना: मजूर झोपलेल्या शेडवरच टाकली टिप्परमधील रेती; पाच मजुरांचा वाळूखाली दबून मृत्यू

जालना: मजूर झोपलेल्या शेडवरच टाकली टिप्परमधील रेती; पाच मजुरांचा वाळूखाली दबून मृत्यू

Jalna News: पुलाचे काम करणाऱ्या मजुरांवर झोपेतच काळाने झडप घातली. रात्री वाळू घेऊन आलेल्या टिप्परच्या चालकाने मजुर झोपलेल्या पत्र्याच्या शेडवरच वाळू टाकली. त्यामुळे मजूर दबले गेले आणि पाच जणांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ गावात रोडवर पुलाचे बांधण्याचे काम सुरू आहे. कामासाठी सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील मजूर या कामासाठी आलेले होते. पुलाचा बाजूलाच मजुरांना राहण्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आलेले होते. 

शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) रात्री सर्वांनी जेवण केले. त्यानंतर पाच जण पत्र्याच्या शेडमध्ये झोपी गेले. दरम्यान या पुलाच्या कामासाठी शनिवारी पहाटेच्या सुमारास एक टिप्पर वाळू घेऊन आला. 

अंधारामध्ये टिप्पर चालकाने सगळी वाळू मजूर झोपलेल्या पत्र्याच्या शेडवरच टाकली. त्यामुळे सर्व मजूर रेतीखाली दबले गेले आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. 

मृतांमध्ये बाप-लेकाचा समावेश

या दुर्दैवी घटनेत गणेश काशिनाथ धनवई (वय ४०, गोळेगाव), भूषण गणेश धनवई (वय १६, गोळेगाव), सुनील समाधान सपकाळ (वय २०, पद्मावती), यांच्यासह अन्य दोन जणांचा मृत्यू झाला. गणेश धनवई आणि भूषण धनवई या बाप-लेकाचा यात मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

टिप्पर चालक फरार

रेती पत्र्याच्या कारशेडवर टाकल्याने गोंधळ उडाला. हे माहिती पडताच टिप्पर चालक रात्रीतून पसार झाला. घाईमध्ये रेती टाकत असताना चालकाने पत्र्याचे शेड असल्याचेही बघितले नाही. अंधारात रेती टाकली आणि त्यांच्या एका चुकीने पाच मजुरांना प्राण गमवावे लागले. 

मिळालेल्या माहितीनुसार, मजुरांसोबत एक १३ वर्षीय मुलगीही तिथे झोपलेली होती. पण, आवाज झाल्याने आजूबाजूला राहणारे काही लोक धावून आले आणि त्यांनी मुलीला बाहेर काढत तिचा जीव वाचवला. 

अपघाताची माहिती मिळताच मृतांचे कुटुंबीय, नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबीयांच्या आक्रोशाने परिसर हादरला होता.

Web Title: Jalna: Sand from a tipper was dumped on the shed where the laborers were sleeping; Five laborers died after being buried under the sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.