जालना जिल्ह्याला पुन्हा एकदा मिळणार दोन मंत्रीपदे ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 13:53 IST2019-12-11T13:47:08+5:302019-12-11T13:53:08+5:30
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. मात्र अनेक नेत्यांनी पक्षाची एकनिष्ठ राहात तग धरला होता. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचे नाव आघाडीवर येते.

जालना जिल्ह्याला पुन्हा एकदा मिळणार दोन मंत्रीपदे ?
- रवींद्र देशमुख
मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र मंत्रीमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रीपदाची लॉटरी कोणाला लागणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. मंत्रीपदांचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झाला असला तरी खातेवाटप ठरत नसल्याने विस्तार रेंगाळला आहे. मात्र जालना जिल्ह्याला यावेळी पुन्हा दोन मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
जालना जिल्ह्यात शिवसेनेला घरघर लागली असून पाचपैकी एकही जागा मिळाली नाही. तर काँग्रेसने कमबॅक करत जालना विधानसभा परत मिळवली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे घनसावंगी मतदार संघ आहे. जिल्ह्यात भाजपने परतूर, बदनापूर आणि भोकरदनमधून विजय मिळवला. 2014 मध्ये जिल्ह्यात भाजपकडून बबनराव लोणीकर आणि शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांना मंत्रीपदं मिळाली होती.
दरम्यान राज्यात अभूतपूर्व स्थितीनंतर सत्तांतर झाले असून प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपला विरोधात बसावे लागले आहे. तर इतर पक्ष राज्यातील संघटनावर भर देण्याच्या तयारीत आहे. मंत्रीपदाच्या माध्यमातून संघटन मजबूत करणे हेच उद्दीष्ट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने ठरवले आहे. त्यामुळे जालना जिल्ह्याला गेल्यावेळप्रमाणे पुन्हा एकदा दोन मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. मात्र अनेक नेत्यांनी पक्षाची एकनिष्ठ राहात तग धरला होता. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचे नाव आघाडीवर येते. टोपे यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून मंत्रीपद मिळणार हे निश्चित मानले जाते. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते. तर गोरंट्याल देखील मंत्रीपदाच्या शर्यतीत असून त्यांना राज्यमंत्रीपद की कॅबिनेट मंत्रीपद मिळणार हे अद्याप निश्चित नाही. गोरंट्याल यांना मंत्रीपद मिळाल्यास जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसला फायदा होऊ शकतो.