पुष्पक एक्स्प्रेसमधील मृत्यूचा थरार आम्ही डोळ्यांदेखत पाहिला, बचावलेल्या प्रवाशांनी कथन केला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 06:14 IST2025-01-24T06:13:25+5:302025-01-24T06:14:19+5:30
Jalgaon Train Accident:

पुष्पक एक्स्प्रेसमधील मृत्यूचा थरार आम्ही डोळ्यांदेखत पाहिला, बचावलेल्या प्रवाशांनी कथन केला अनुभव
कल्याण : मुंबईला येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेस दुर्घटनेत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. मात्र, नेमकी घटना कशी घडली, याची माहिती जेव्हा पुष्पक एक्स्प्रेस कल्याण स्थानकात आली तेव्हाच कळली. या अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी सांगितले की, मृत्यूचा थरार आम्ही डोळ्यादेखत पाहिला. त्यावेळी काळजाचे पाणी पाणी होत होते. भीतीपोटी प्रवासी मृत्युमुखी पडले. आम्ही बचावलो हे आमचे भाग्य समजतो.
प्रवासी नितीन गायकवाड यांनी सांगितले की, गाडीने जळगाव सोडले. आमचे काही सहकारी हे दुसऱ्या बोगीत होते. त्यांनी आम्हाला फोन केला की, गाडीला आग लागली आहे. मात्र, गाडीला आग लागलेली नव्हती. कोणीतरी चालत्या गाडीची चेन खेचली. चेन खेचणाऱ्याला वाटले की, गाडीला आग लागली. चेन खेचल्याने गाडीच्या चाकांचे रुळावर घर्षण झाले. त्यातून ठिणग्या उडाल्या. या ठिणग्या पाहूनच भीतीपोटी प्रवाशांनी उड्या मारल्या. मृत प्रवाशांपैकी दोन प्रवाशांचे मृतदेह चाकात अडकल्याचे त्यांनी सांगितले.
बातमी बघाताच फोनाफोनी सुरू
प्रवासी संदीप जाधव यांनी सांगितले की, ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बुद्धगया येथे गेले होते. परतीचा प्रवास करताना त्यांनी लखनऊ रेल्वेस्थानकातून पुष्पक एक्स्प्रेस पकडली.
अपघाताची बातमी टीव्हीवर दिसताच घरातून आम्हाला फोन सुरू झाले. या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी फोनवरून माझ्याकडे घडल्या प्रकाराची विचारणा करून घटनेविषयी माहिती घेतली. याच गाडीने आम्ही रात्री पावणेबारा वाजता कल्याण स्थानकात सुखरूप पोहोचलो.
भिवंडीतील चौघांचा मृत्यू
भिवंडी : पुष्पक एक्स्प्रेसच्या अपघातात भिवंडीतील जयगडी व विश्वकर्मा या दोन नेपाळी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. जयकला जयगडी (६०), नन्ना विश्वकर्मा (५५), त्यांची पत्नी मैश्रा विश्वकर्मा (४५) व मुलगा हेमंत विश्वकर्मा (११) अशी मृतांची नावे आहेत. या दोन्ही कुटुंबांतील नऊ सदस्य पुष्पक एक्स्प्रेसमधून भिवंडीकडे येत होते.
जयकला या मूळच्या नेपाळमधील असून, त्यांचा मुलगा भिवंडीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. जयकला या भिवंडीत नातवंडांना प्रथमच भेटण्यासाठी व उपचारासाठी येत होत्या. जयकला यांनी अपघात होण्याच्या एक तास आधी नातवंडांसोबत व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला होता.
दुसरीकडे, याच कुटुंबाचे नातेवाईक असलेले नेपाळ येथील कुच्ची कलिकास्थानमधील नन्ना विश्वकर्मा पुण्यात एका कंपनीत काम करीत होते. त्यांची पत्नी मैश्रा विश्वकर्मा या आजारी असल्याने त्यांनाही उपचारासाठी ते गावाहून मुलगा हेमंत व इतर तीन जणांसह येत होते. अपघातात नन्ना, मैश्रा व हेमंत यांचा मृत्यू झाला.