Ram Shinde News: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांनीराम शिंदेंचा पराभव केला. २०१४ मध्ये अजित पवार भाजपसोबत असताना राम शिंदे विजयी होतील, असे अंदाज होते. मात्र, राम शिंदेंचा निसटता पराभव झाला. या दोन पराभवानंतर आता राम शिंदे २०२९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आता जवळ आलं आहे. पुढच्या वेळी मी सोडणार नाही, असे म्हणत राम शिंदेंनी रोहित पवारांविरोधात दंड थोपटले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सोलापूर दौऱ्यात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. बारामतीकरांची वक्रदृष्टी तुमच्यावर पडली, असं तुम्ही म्हणालात. आता त्याच पवारांपैकी एक पवार तुमच्यासोबत महायुतीमध्ये आहेत. सध्या विधान परिषदेत सर्वोच्च पदावर तुम्ही आहात. तरीही २०२९ ची विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत तुमच्याकडून दिले गेले आहेत? असे राम शिंदे यांना विचारण्यात आले.
'अजित पवार प्रचार करणार की नाही, हे...'
या प्रश्नाला उत्तर देताना राम शिंदे म्हणाले, "एक निवडणूक झाली. पराभव झाला. दुसरी निवडणूक झाली, ६२२ मतांच्या फरकाने पडलोय. आता जवळ आलंय. आणि हाता तोंडाला आलेला घास ज्यावेळी जातो, त्यावेळी माणसाच्या मनात हीच भावना असते की, पुढच्या वेळी तरी मी सोडणार नाही. त्यामुळे मी २०२९ ला लढायला तयार आहे. आता यावेळी तर केला नाही, असे त्यांनीच सांगितलं. आता पुढच्या वेळी करतील की नाही, हे त्यावेळीच ठरेल", असे राम शिंदे म्हणाले.
वाघ्या कुत्र्यांची समाधी, शिंदे म्हणाले...
वाघ्या कुत्र्यांच्या समाधीच्या वादाबद्दल राम शिंदे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण राज्याचे आणि देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये घेतलेल्या भूमिका; आताच्या काळात त्यांच्या भूमिकांशी फारकत कुणाला करता येणार नाही. हा प्रश्न ऐतिहासिक आहे. त्याचे पुरावे द्यावे लागतील. त्यामुळे हा बसवताना कसा बसवला आणि बसवला त्यावेळी काय झालं? काढला आणि परत का बसवला? या सगळ्या बाबींवर विचारविनिमय आणि सर्व त्याचे पुरावे तपासण्याची आवश्यकता आहे."
"हा मुद्दा कुणीही राजकीय करण्याची आवश्यकता नाही. त्यावेळी ते राजे एकमेकांना सहकार्य करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जी भूमिका होती. नंतरच्या कालखंडामध्ये होळकर घराण्याने त्या विचाराचे अनुकरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरतीच होळकर, शिंदे, गायकवाड आणि जे कोणी राजे होते, त्यांनी काम केले. यामध्ये काही लोकांना वाद निर्माण करायचा आहे", अशी भूमिका राम शिंदेंनी मांडली.