धावत्या रेल्वेत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविता येणार
By Appasaheb.patil | Updated: June 26, 2019 12:27 IST2019-06-26T12:25:01+5:302019-06-26T12:27:35+5:30
भावी तंत्रज्ञ : डब्ल्यूआयटीच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांचा यशस्वी प्रयोग

धावत्या रेल्वेत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविता येणार
सोलापूर : भारतीय रेल्वेचे विस्तीर्ण जाळे देशभर पसरले असून ही जगातील चौथी सर्वात मोठी प्रवासी व्यवस्था आहे. वेगवान रेल्वेमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी वालचंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमधील इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी यशस्वी उपकरण विकसित केले आहे. या उपकरणाची माहिती घेऊन रेल्वे प्रशासनाने देखील या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
दरम्यान, तंत्रज्ञानाचा कल्पकतेने उपयोग करून भडकलेल्या आगीवर नियंत्रण आणणारे हे स्वयंचलित उपकरण भविष्यात निश्चितच दिलासा देणारे ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाला अशा प्रयोगाबाबत कुतूहल वाटणे स्वाभाविक आहे, म्हणूनच सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियांत्रिकी निसार देशमुख आणि (ओ.एन.सी.) दीपक खोत यांनी डब्ल्यूआयटीच्या विद्यार्थ्यांच्या या उपकरणाची माहिती घेतली.
वालचंद महाविद्यालयातील रोहित आडम, सागर निंबर्गीकर, मल्लेश्वरी भीमनपल्ली हे इलेक्ट्रॉनिक्स शाखेत अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी या नावीन्यपूर्ण प्रयोगात सहभागी आहेत. प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे आणि विभाग प्रमुख डॉ. सचिन गेंगजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. ऐलिया चांदणे यांचे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
काय व कसे मिळविता येणार आगीवर नियंत्रण
- रेल्वेत अचानक भडकलेल्या आगीमुळे जीवित हानी मोठ्या प्रमाणात होते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मालमत्तेचेही नुकसान होते. सध्या रेल्वेमध्ये आग नियंत्रणासाठी अग्निशमन यंत्रणा (सिलिंडर) ठेवलेल्या असतात, पण हे सिलिंडर वापरायचे कसे आणि आग कशी विझवायची याची माहिती लोकांना नसते. अशा वेळेस या यंत्रणेचा अपघातावेळी उपयोग होत नाही. विद्यार्थ्यांनी याचा नेमकेपणाने अभ्यास करून स्वयंचलित यंत्र बनविले आहे. या यंत्राने आग लागल्यानंतर प्रथम सेन्सरद्वारे याची माहिती उपकरणास होते. त्यानंतर तत्काळ एक्झॉस्ट फॅन आणि वॉटर स्प्रिंकलर सुरू होते. त्यामुळे आग शमण्यास मोठी मदत होते. गाडीचालकाला एलसीडीवर गाडीच्या नेमक्या कोणत्या कोचमध्ये आग लागली आहे ते तत्काळ समजण्याची सोय असल्यामुळे वाहकाला गाडीचा वेग कमी करण्याची सूचना मिळते.
जीपीएसच्या साहाय्याने घटनेची माहिती इंजिनमध्ये बसलेल्या ड्रायव्हरला व इमर्जन्सी सर्व्हिसेस देणाºया एजन्सीज जसे की (हॉस्पिटल, अग्निशमन दल, पोलीस स्टेशन) यांना संदेश पाठवून अधिक मदतीसाठीचे आवाहन करण्याची सोय करण्यात येते. आॅर्डिनो (मायक्रो कंट्रोलर) हा या उपकरणातील महत्त्वाचा दुवा आहे. या प्रयोगासाठी खर्चही अत्यल्प असून यावर आणखी संशोधन झाल्यास भविष्यात रेल्वेसह सर्व प्रवासी वाहन आणि लोकांच्या दाटीवाटीच्या ठिकाणी, राष्ट्रीय बहुराष्ट्रीय कंपन्या, शाळा, महाविद्यालय अशा सगळ्याच ठिकाणी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे.