खा. अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेंची भूमिका स्वीकारली ते चुकीचं; जितेंद्र आव्हाड नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 10:53 PM2022-01-20T22:53:56+5:302022-01-20T22:58:53+5:30

गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका जो कोणी साकारले त्याचा आम्ही विरोध करतो असं मत जितेंद्र आव्हाडांनी मांडलं आहे.

It is wrong that MP Amol Kolhe accepted the role of Nathuram Godse; NCP Jitendra Awhad upset | खा. अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेंची भूमिका स्वीकारली ते चुकीचं; जितेंद्र आव्हाड नाराज

खा. अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेंची भूमिका स्वीकारली ते चुकीचं; जितेंद्र आव्हाड नाराज

Next

मुंबई – राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे यांनी Why I Killed Gandhi या सिनेमात नथुराम गोडसेंची भूमिका साकारली. त्यावरुन राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस खासदार हुसैन दलवाई यांनी नाराजी बोलून दाखवलेली असताना मंत्री जितेंद्र आव्हाडांनीही विरोध केला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेंची भूमिका स्वीकारली ते चुकीचं आहे. कलाकाराने समाजाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. गांधींचा खून करणाऱ्या नथुरामची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध आहे असं त्यांनी म्हटलं.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी गेली २० वर्षे गांधी विरोधाच्या चित्रपटांना विरोध केला तो एक वैचारिक विरोध आहे. कुठलाही कलाकार एखादी भूमिका करतो तेव्हा ती भूमिका अंगात उतरत असते. खासदार यांनी ही भूमिका स्वीकारली हेच चुकीचं आहे. कलाकाराने समाजाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. वर्ष कोणतेही असो विरोध हा विरोध आहे. भूमिका आणि माणूस हे वेगळं असू शकत नाही. व्यक्ती चारित्र्य साकारत असताना ते उतरतच मग ते वेगळं कसं असेल. नथुरामचा उद्दाती करणं जे करेल त्याला माझा विरोध असेल. पक्षाची यात काही घेणं देणं आहे ही वैयक्तिक भूमिका आहे. नथुराम महाराष्ट्राला लागलेला काळा डाग आहे. कलाकार म्हणून अमोल कोल्हे महान आहेत पण त्यांनी ही भूमिका स्वीकारली नव्हती पाहिजे असं त्यांनी सांगितले.

तसेच मैने गांधी को क्यू मारा ओटीटी प्लेट फॉर्मवर येतोय. त्यालाही वैचारिक दृष्टिकोनातून माझा विरोध आहे. गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका जो कोणी साकारले त्याचा आम्ही विरोध करतो. शरद पोंक्षे आणि विनय आपटे यांचं नाटक आम्ही उधळलं होतं. नथुराम गोडसे हा डाग गडद करण्याचं काम करू नये. मला विरोध करावाच लागेल. अमोल कोल्हेंशी बोललो. कोणत्याही परिस्थितीत माझी भूमिका बदलणार नाही असा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

या सिनेमावर प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे म्हणाले की, आपण जी भूमिका साकारतो त्यातील प्रत्येक भूमिकेशी आपली सहमती असते. काही घटनांना १०० टक्के वैचारिक सहमती असते तर काही भूमिकांशी सहमती नसते ही साधी आणि सोपी गोष्ट आहे. २०१७ मध्ये या सिनेमात काम केले होते हा चित्रपट आता रिलीज होतोय. या मधल्या काळात बऱ्याच घटना घडल्या. मी नथुराम गोडसेंच्या उदात्तीकरणाची भूमिका कधीच घेतलेली नाही. कलाकार म्हणून मी या सिनेमात काम केले आहे. यामध्ये काहीही नाकारण्याचं किंवा लपवण्याचं कारण नाही असं मला प्रामाणिक वाटतं. व्यक्ती म्हणून मला विचार स्वातंत्र्य आहे आणि कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. दोन्हीमध्ये गल्लत होऊ नये असं त्यांनी सांगितले.

Web Title: It is wrong that MP Amol Kolhe accepted the role of Nathuram Godse; NCP Jitendra Awhad upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.