तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 12:19 IST2025-10-11T12:15:03+5:302025-10-11T12:19:05+5:30
Maha Vikas Aghadi MNS News: राज ठाकरे यांना सोबत घेतले तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘त्या’ मतांवर थेट आणि विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मविआतील धुसपूस वाढल्याचे बोलले जात आहे.

तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
Maha Vikas Aghadi MNS News: ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यता जोर धरत असतानाच राज ठाकरेमहाविकास आघाडीत जाणार की, उद्धव ठाकरे बंधूप्रेमासाठी आघाडीतून बाहेर पडणार, यावरही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. परंतु, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला महाविकास आघाडीत घेण्याबाबत नकार असल्याचे म्हटले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. इंडिया आघाडीच्या वाटाघाटी काँग्रेसच्या स्थानिक पातळीवर होणार आहेत. जिल्हा आणि ब्लॉक त्याशिवाय तिथले जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष युतीबाबत निर्णय घेणार आहेत. त्यांच्या निर्णयावर आम्ही सगळ्या गोष्टी सोडल्या आहेत. त्यामुळे नवीन भिडूची आवश्यकता काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला नाही, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले होते. परंतु, काही मतांवर डोळा ठेवून सपकाळ यांनी तसे विधान केले. त्यामुळे उद्धवसेनेची मात्र पंचाईत होणार असल्याचे बोलले जात आहे.
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस?
आम्हाला महाविकास आघाडीत तिसऱ्या भिडूची गरज नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. त्यांचा रोख हा उद्धवसेनेशी जवळीक साधलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेकडे असल्याचे वेगळे सांगायला नको. 'मविआ'त अगोदरच काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी आहे. राज यांना 'मविआ'मध्ये घेतल्यास अमराठी मतांवर त्याचा थेट आणि विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अमराठी मते आपल्यापासून दूर जाऊ नयेत, म्हणूनही कदाचित, सपकाळ यांनी ते विधान केले असावे. पण यामुळे उद्धवसेनेची मात्र नक्कीच पंचाईत होईल का? अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेसह राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे बंधूंच्या भेटी वाढल्या असून, राज ठाकरे यांनी अचानक ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांत ठाकरे बंधू वेगवेगळ्या निमित्ताने ५ वेळा एकत्र आले आहेत. संजय राऊत यांच्या घरी बारशानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. या भेटीनंतर राज ठाकरे आपल्या घरी न जाता थेट ‘मातोश्री’वर गेले. ‘मातोश्री’वर दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील मिळाला नसला तरी मुंबई महापालिकेसह राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.