सर्वशिक्षा अभियानात अनियमितता

By Admin | Updated: August 20, 2014 01:04 IST2014-08-20T01:04:44+5:302014-08-20T01:04:44+5:30

सर्वशिक्षा अभियानांतर्गत सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. महापालिकादेखील आपला वाटा देते. मात्र, या निधीतून शाळांमध्ये होणाऱ्या बांधकामांत गुणवत्ता नाही. काही शाळांमध्ये तर

Irregularities in the Sarva Shiksha Abhiyan | सर्वशिक्षा अभियानात अनियमितता

सर्वशिक्षा अभियानात अनियमितता

मनपाच्या सभेत प्रश्न : महापौरांचे चौकशीचे आदेश
नागपूर : सर्वशिक्षा अभियानांतर्गत सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. महापालिकादेखील आपला वाटा देते. मात्र, या निधीतून शाळांमध्ये होणाऱ्या बांधकामांत गुणवत्ता नाही. काही शाळांमध्ये तर पाच शौचालयांसाठी निधी देण्यात आला, मात्र प्रत्यक्षात तीनच शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. निधीचा अपहार झाल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेविका आभा पांडे यांनी महापालिकेच्या सभेत प्रश्नकाळात केला. याची दखल घेत महापौर अनिल सोले यांनी अभियानांतर्गत खर्च केलेली रक्कम व झालेली कामे यातील तफावत शोधण्यासाठी चौकशी करण्याचे निर्देश आयुक्त श्याम वर्धने यांनी दिले. पुढील सभेत या प्रकरणाची संपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
आभा पांडे म्हणाल्या, २००४-०५ मध्ये शाळा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली. मात्र, संबंधित योजनेंतर्गत मिळणारा निधी खर्च करण्याची नियमावली २०११ मध्ये तयार करण्यात आली. प्रशासनाकडे जेव्हा अभियानाचे नियम, कार्यप्रणाली व केलेल्या कामांची माहिती मागण्यात आली तेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना टाळाटाळीची उत्तरे दिली. योजनेंतर्गत भरपूर निधी मिळत असतानाही महापालिकेने अतिरिक्त ३२ लाख रुपये मंजूर केले आहेत. या योजनेंतर्गत करण्यात आलेल्या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना शिक्षाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी सांगितले की, शाळा व्यवस्थापन समितीच्या देखरेखीखाली अभियानाचे कार्य चालते. मात्र, पांडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. शेवटी उपायुक्त रिजवान सिद्दिकी यांना उत्तर देण्यासाठी समोर यावे लागले. (प्रतिनिधी)

Web Title: Irregularities in the Sarva Shiksha Abhiyan