Vidhan Sabha 2019: निवडणूक जाहीर होताचं, इच्छुकांची मुंबई वारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 15:20 IST2019-09-24T15:12:28+5:302019-09-24T15:20:04+5:30
विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरण्यासाठी सर्वच पक्षात इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे

Vidhan Sabha 2019: निवडणूक जाहीर होताचं, इच्छुकांची मुंबई वारी
मुंबई - विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर करताच सर्वच मतदारसंघातील इच्छुक अधिक जोमात कामाला लागले आहेत. तर पक्षाची उमेदवारी आपल्याच पदरात पडावी म्हणून इच्छुकांच्या मुंबई वाऱ्या सरू झाल्या आहेत. तर पक्षातील वरिष्ठांना उमेदवारीसाठी भेटीगाठी सुद्धा अनेकांनी वाढवल्या असल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरण्यासाठी सर्वच पक्षात इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. कुणी दुसऱ्यांदा उमेदवारी मिळावी म्हणून, तर कुणी एकदा तरी संधी द्यावी म्हणून प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे भाजप-शिवसेना पक्षात सर्वाधिक इच्छुकांनी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यातच युती होणार नसल्याच्या चर्चेनंतर या दोन्ही पक्षातील इच्छुकांच्या मुंबई वाऱ्या सुरु झाल्या आहेत.
त्यातच भाजपकडून यावेळी काही विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार असल्याच्या चर्चेनंतर अनेकजण मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. त्याचबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादीमधून अनेक विद्यमान आमदारांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांच्या जागी आघाडीकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांनी मुंबईत फिल्डिंग लावली असल्याचे पाहायला मिळत आहे.
सर्वच राजकीय पक्षाचे मुख्य कार्यलय व नेते मुंबईत असल्याने इच्छुकांचा मुक्काम मतदारसंघात, तर दिवस राज्याच्या राजधानीत उजडत आहे. प्रत्येकजण उमेदवारी आपल्यालाचं मिळावी म्हणून प्रयत्न करत आहे. तर आपल्या खंदे समर्थकालाच उमेदवारी मिळावी म्हणून पक्षातील महत्वाचे नेते सुद्धा आपापल्यापरीने प्रयत्न करत असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.