आवाजाचे नमुने देण्यास इंद्राणीचा नकार

By Admin | Updated: November 1, 2015 01:12 IST2015-11-01T01:12:47+5:302015-11-01T01:12:47+5:30

बहुचर्चित शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने सीबीआयला आवाजाचे नमुने देण्यास शनिवारी नकार दिला. तब्येत ठिक नसल्याने ती नमुने देण्यास असमर्थ आहे

Indrani's refusal to give voice samples | आवाजाचे नमुने देण्यास इंद्राणीचा नकार

आवाजाचे नमुने देण्यास इंद्राणीचा नकार

मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने सीबीआयला आवाजाचे नमुने देण्यास शनिवारी नकार दिला. तब्येत ठिक नसल्याने ती नमुने देण्यास असमर्थ आहे, असे तिच्या वकिलांनी दंडाधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर दंडाधिकाऱ्यांनी तिच्या आवाजाचे नमुने घेण्यापूर्वी तिचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, इंद्राणीसह तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत ७ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
सीबीआयला चौकशीची परवानगी दिल्यानंतर पहिल्यांदाच या तिघांना दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. यावेळी आतापर्यंत इंद्राणीची दोनदा चौकशी करण्यात आल्याचे सीबीआयने दंडाधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, अद्याप तपास पूर्ण न झाल्याने तिघांकडे पुन्हा चौकशी करण्याची आवश्यकता भासू शकते, असेही सांगितले. इंद्राणीच्या आवाजाचे नमुने अद्याप घ्यायचे असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणले असता, तिच्या वकिलांनी इंद्राणी सीबीआयला मदत करत आहे, परंतु सध्या तिची मानसिक आणि शारीरिक स्थिती ठीक नसल्याने ती आता आवाजाचे नमुने देऊ इच्छित नाही, असे दंडाधिकाऱ्यांंना सांगितले. त्यावर दंडाधिकाऱ्यांनी इंद्राणीला आवाजाचे नमुने देणार का, अशी विचारले असता, तिने ‘नाही सर’ असे दंडाधिकाऱ्यांना सांगितले. तिची प्रकृती ठीक नसताना तिची चौकशी करण्यात येऊ नये, असे तिच्या वकिलांनी म्हटल्यावर दंडाधिकाऱ्यांनी तिची चौकशी करण्यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल घेऊन या, असे सांगितले. चौकशीसाठी दिलेली १२ दिवसांची मुदत संपल्याने तिघांनाही दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Indrani's refusal to give voice samples