"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 13:47 IST2025-05-17T13:46:16+5:302025-05-17T13:47:08+5:30
विशेष म्हणजे या शिष्टमंडळांमध्ये देशातल्या सर्व राजकीय पक्षांचा देखील समावेश केल्यामुळे दहशतवाद विरोधात देशाची एकजूट आहे हे चित्र दिसलं असं शिंदेंनी सांगितले.

"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
मुंबई - पहलगामचा माणुसकीला काळीमा फासणारा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या काळात भारताने पाकिस्तानचा जगासमोर आणलेला दहशतवादाचा चेहरा हा कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा मोठा विजय आहे असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केले आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने जागतिक स्तरावर दहशतवाद आणि पाकचा चेहरा उघड करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरचाच एक भाग म्हणून भारताची दहशतवादविरोधी 'झिरो टॉलरन्स’ भूमिका अधिक प्रभावीपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी सात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळे वेगवेगळ्या राष्ट्रांना पाठवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून अभिनंदन करतो. ही भारताच्या परराष्ट्र धोरणातील एक ऐतिहासिक पायरी ठरणार आहे. विशेष म्हणजे या शिष्टमंडळांमध्ये देशातल्या सर्व राजकीय पक्षांचा देखील समावेश केल्यामुळे दहशतवाद विरोधात देशाची एकजूट आहे हे चित्र दिसलं असं त्यांनी सांगितले.
पहलगामचा माणुसकीला काळीमा फासणारा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या काळात भारताने पाकिस्तानचा जगासमोर आणलेला आतंकवादाचा चेहरा हा कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा मोठा विजय आहे असं मी समजतो.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 17, 2025
आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूरचाच एक भाग म्हणून भारताची दहशतवादविरोधी 'झिरो टॉलरन्स’ भूमिका…
तसेच संपूर्ण जगाला दहशतवादाची गंभीर समस्या आहे. याच्या विरोधात ठामपणे उभं राहण्यासाठी अशा रितीने उचललेलं हे पाऊल जगभरात भारताची प्रतिमा एक जबाबदार, शांतताप्रिय आणि दहशतवाद विरोधात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्र म्हणून उजळेल असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
शिष्टमंडळात कोणाचा समावेश?
भारताचे हे शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य देश आणि इतर प्रमुख देशांचा या महिन्याच्या अखेरीस दौरा करेल. या शिष्टमंडळात काँग्रेसचे शशी थरूर, भाजपाचे रविशंकर प्रसाद, जनता दलाचे संजय कुमार झा, भाजपाचे बैजयंत पांडा, डीएमकेचे कनीमोई करुणानिधी, शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे, शिंदेसेनेकडून श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. माहितीनुसार, हे शिष्टमंडळ अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कतार आणि संयुक्त अरब अमीरातसारख्या देशांचा दौरा करतील. हा परदेश दौरा २२ मे पासून सुरू होण्याची शक्यता आहे. भारत सरकारचा हा प्रयत्न जागतिक पातळीवर पाकिस्तानकडून पोसला जाणारा दहशतवाद आणि भारताच्या नागरी वस्त्यांवरील हल्ले याची माहिती प्रमुख देशांना देणार आहे.