"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 20:03 IST2025-09-29T20:00:27+5:302025-09-29T20:03:56+5:30
भारत पाकिस्तान सामन्यावरुन आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
Aditya Thackeray on IND VS PAK Match: भारताने पाकिस्तानला हरवून आशिया कप जिंकला. भारत स्पर्धेत अपराजित राहिला आणि पाकिस्तानकडून विजय हिसकावून घेतला. तिलक वर्माने भारतासाठी एक अपवादात्मक खेळी खेळली आणि नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला. मात्र या विजयानंतर राजकारण तापलं आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला भारताने पुन्हा एकदा धूळ चारली. यावेळी भारतीय संघाने आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानी मंत्री मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यावरुनच आदित्य ठाकरे यांनी टीका केली. ट्रॉफी न स्विकारणं आणि हस्तांदोलन न करणं ही सगळी नाटकं असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने हरवून ९ व्यांदा विजेतेपद पटकावले. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले होते. त्यामुळे सामन्यांमध्ये खेळाडूंमध्ये तणाव पाहायला मिळाला. सुरुवातीपासून भारतीय संघाने पाकिस्तानी संघाला महत्त्व दिलं नाही. त्यानंतर ट्ऱॉफी स्विकारण्यासही नकार दिला. या कृतीमुळे भारतीय संघाचे कौतुक करण्यात येत आहे. दुसरीकडे यावरुन आदित्य ठाकरे यावरुन भाजपवर निशाणा साधला. आपण हा सामना खेळायला नको होता, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तर भाजप आपल्याला अशी देशभक्ती शिकवणार का? असाही सवाल आदित्य
ठाकरे यांनी केला.
"हात मिळवणे किंवा न मिळवणे, ट्रॉफी घेणे किंवा न घेणे, ही सगळी नाटकं आहेत. सगळ्यात आधी आपण खेळायला नको होते. पाकिस्तानने बिहारमधील हॉकी आशिया कपवर बहिष्कार टाकला. आपण यावर बहिष्कार टाकू शकलो नसतो का? हे संपूर्ण ऑपरेशन सिंदूर पहलगाममध्ये आपल्या भारतीय नागरिकांना मारल्यामुळे घडले. भाजप असेही म्हणते की त्यांना मारण्यात आले कारण ते हिंदू होते. गेल्या वर्षी आपल्याला सांगण्यात आले की बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. म्हणूनच बीसीसीआयने त्यांना येथे बोलावले आणि बांगलादेशसोबत द्विपक्षीय मालिका खेळली. त्याच भारत सरकारने बांगलादेशला तांदूळ आणि धान्य पाठवले. या वर्षी पहलगाममध्ये हल्ला झाला. हिंदू मारले गेले. याचा सूड म्हणून भारत पाकिस्तानविरुद्ध खेळत आहे. हे काय आहे? आणि हीच भाजप आपल्याला देशभक्ती शिकवणार का? तुम्ही फक्त एका सामन्यापासून मागे हटू शकत नाही का? आपल्या सैनिकांचे शहीदत्व क्रिकेटपेक्षा कमी महत्त्वाचे आहे का? तुम्हाला याचा विचार करण्याची गरज आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या एक्स पोस्टवरूनही निशाणा साधला. खेळाच्या मैदानातही ऑपरेशन सिंदूर झालं असं पंतप्रधान मोदी म्हणाले. "मला वाटते की हे दुर्दैवी आहे की ऑपरेशन सिंदूर, ज्यामध्ये आपल्या सैनिकांनी शौर्य दाखवले, शहीद झाले याची तुलना खेळाशी केली जात आहे. काही लोक म्हणतात की राजकारण आणि खेळाला एकत्र आणू नका. पण जेव्हा दहशतवादी येतात तेव्हा ते विचारतात का? भारतीयांवर ते हल्ले करतात मग आपण त्या देशासोबत का खेळायचं?" असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.