‘एवढीच खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत आमच्याविरोधात लढा’, श्रीकांत शिंदेंचं गणेश नाईकांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 16:41 IST2026-02-15T16:40:21+5:302026-02-15T16:41:20+5:30
Shrikant Shinde Challenges Ganesh Naik: भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात गेल्या काही काळापासून जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. तसेच दोन्हीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान दिलं जात आहे.

‘एवढीच खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत आमच्याविरोधात लढा’, श्रीकांत शिंदेंचं गणेश नाईकांना आव्हान
अंबरनाथ - भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात गेल्या काही काळापासून जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. तसेच दोन्हीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान दिलं जात आहे. याचदरम्यान, गणेश नाईक यांनी फक्त पक्षाने आदेश दिला तर श्रीकांत शिंदे यांच्या नावासमोर कायमचं माजी खासदार लिहावं लागेल असा इशारा दिला होता. त्यानंतर आता श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईकांना प्रत्युत्तर दिलं आहे. गणेश नाईक यांना खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आमच्या समोर निवडणूक लढवावी, असं आव्हान श्रीकांत शिंदे यांनी दिलं आहे.
गणेश नाईक यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, गणेश नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यामुळे ते काहीही टीका करत आहेत. तर गणेश नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये. नागरिकांनी त्यांना अनेकदा माजी केलं आहे याचे त्यांनी भान ठेवावे. आणि जर एवढीच खुमखुमी असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा अथवा हवे तिथून आमच्या समोर येऊन निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान देखील श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना यावेळी दिले.
दरम्यान , काल नगरविकास खात्यातील कारभारावरूनदेखील गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. "नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी भूखंड मागितले होते. ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जात आहेत. नगरविकास खात्यातील लोकांनी हे कर्म दरिद्री काम केले आहे. रुग्णालया करिता. बागे करिता. एखाद्या शाळे करिता, भूखंड मागितले, पण ते दिले गेले नाही. काही दलालांनी ते बिल्डरांच्या घशात घातले, असा आरोप गणेश नााईक यांनी केला होता.