काँग्रेसने मुंबई जिंकली तर महाराष्ट्र जिंकेल, महाराष्ट्र जिंकला तर दिल्ली जिंकणार - मल्लिकार्जुन खरगे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 09:51 PM2018-07-09T21:51:35+5:302018-07-09T21:52:21+5:30

काँग्रेस नेते आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे हे सध्या मुंबईच्या दौ-यावर आहेत.

If Congress win Mumbai, then win Maharashtra, win Maharashtra, Delhi wins - Mallikarjun Kharge | काँग्रेसने मुंबई जिंकली तर महाराष्ट्र जिंकेल, महाराष्ट्र जिंकला तर दिल्ली जिंकणार - मल्लिकार्जुन खरगे

काँग्रेसने मुंबई जिंकली तर महाराष्ट्र जिंकेल, महाराष्ट्र जिंकला तर दिल्ली जिंकणार - मल्लिकार्जुन खरगे

Next

मुंबई- काँग्रेस नेते आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे हे सध्या मुंबईच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेत त्यांना बौद्धिक दिलं आहे. ते म्हणाले, मुंबईतील आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश हा सर्व कार्यकर्ते व नेत्यांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याचा आहे. काँग्रेस पार्टी घराघरांत पोहोचवणे, ही काळाची गरज आहे. म्हणूनच "काँग्रेस आपल्या दारी" हा कार्यक्रम सुरू करत आहोत.

बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विचार, आचार आणि प्रचार दिला. नेहरू व गांधी परिवारांनी विचारधारा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले, पण सर्वांनी हे आचरणात आणले पाहिजे. आगामी निवडणुकांमध्ये मुंबई जिंकली तर महाराष्ट्र जिंकेल, महाराष्ट्र जिंकला तर दिल्ली दिल्ली जिंकेल आणि राहुल गांधी भारताचे पंतप्रधान होतील. यासाठीच काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. छोटे-मोठे मतभेद विसरून कामाला लागा. काँग्रेसचे सरकार बनण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे.

मुंबईतील सहाच्या सहा जागा जिंकून आणायलाच पाहिजे. सहाच्या सहा जागा जिंकल्या तर मला व राहुल गांधींना फार आनंद होईल. आपल्याला स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी, स्वतःच्या संरक्षणासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाला जिंकून द्यायला पाहिजे. यासाठी त्याग करायलाही पाहिजे, असे उद्गार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात षण्मुखानंद सभागृहात काढले. या कार्यक्रमाला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संपत कुमार, सोनल पटेल आणि आशिष दुआ यांच्या सोबत काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते, आजी-माजी खासदार व आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमात "काँग्रेस आपल्या दारी" व "प्रोजेक्ट शक्ती" हे दोन उपक्रम सुरू करण्यात आले.

मल्लिकार्जुन खरगे आरएसएस व भाजपा यांच्यावर टीका करताना म्हणाले की, आरएसएसचे लोक स्वातंत्र्याच्या लढाईत कधीच नव्हते. भाजपाचे लोक स्वातंत्र्यासाठी कधीच तुरुंगात गेले नाहीत. याउलट काँग्रेसचे हजारो लोक स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेले. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी आपले प्राणही दिले. आरएसएस किंवा भाजपामधील लोकांपैकी कोणीही आपले प्राण दिलेले नाहीत आणि आता हे लोक आपल्याला त्याग शिकवायला निघाले आहेत. भाजपाला सरकार चालवता येत नाही. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रामध्ये सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. निवडणुका नऊ महिन्यांवर आल्या आहेत म्हणूनच शेतकरी हमीभाव जाहीर केला.

चार वर्षांत का जाहीर केला नाही, असा सवालही त्यांनी मोदी सरकारला विचारला. भाजप सत्तेत आल्यापासून दलित अत्याचार व अल्पसंख्याकांवर अत्याचार प्रचंड प्रमाणात वाढले. कारण हे सरकार या लोकांना पुढे येऊ देत नाही. याउलट अत्याचार करणाऱ्यांना या सरकारचा पाठिंबा आहे. 2017 मध्ये सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये व भ्रष्टाचारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे भाजप सरकारला 10 लाख करोड रुपयांचा फायदा झाला. नरेंद्र मोदींवर टीका करताना खरगे म्हणाले की, देशाला भाषण नको राशन पाहिजे. न्यायाची जेव्हा गोष्ट येते तेव्हा नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. दलित, महिला, अल्पसंख्याक यांच्यावरील अत्याचारांवर नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. ते फक्त स्वतः बद्दलच बोलतात. नरेंद्र मोदी काँग्रेसला बैलगाडी बोलले, परंतु भाजपचे काही लोक बेलवर (जामीन) आहे तर काही लोक जेलमध्ये आहेत. तर काही लोक बँकांतील पैसा घेऊन पळून गेले आहेत. ललित मोदी, नीरव मोदी देशाबाहेर पळून गेले आहेत. तर नरेंद्र मोदीला येणाऱ्या निवडणुकांमध्ये सत्तेतून बाहेर पाठवायचे आहे, अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

या कार्यक्रमात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, भाजप सरकार व नरेंद्र मोदी यांची दिवसेंदिवस लोकप्रियता कमी-कमी होत चालली आहे. देशातील जनता प्रचंड नाराज आहे. याउलट काँग्रेस व आपले अध्यक्ष राहुल गांधी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राहुल गांधी यांनी मुंबईसह संपूर्ण देशात नवचैतन्य निर्माण केले आहे. 2019 मध्ये काँग्रेस परत सत्तेवर येणार, असे लोक आता म्हणायला लागले आहेत. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात राग निर्माण झालेला आहे.

मुंबई काँग्रेसतर्फे गेल्या दोन वर्षांत शिवसेना-भाजप भ्रष्टाचार, महागाई, मनपातील भ्रष्टाचार, पेट्रोल-डिझेल दरवाढ, जस्टीस लोया प्रकरण यासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरून आंदोलन केले, मोर्चे काढले आणि या सरकारला जागे करण्याचे काम केले. मोदी सरकारच्या काळात बारा करोड तरुण बेरोजगार झाले. गेल्या तीन वर्षांत एका पैशाचीही गुंतवणूक झाली नाही किंवा नवीन प्रकल्प आला नाही. सरदार वल्लभभाई पटेल, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांची फक्त घोषणाच केली. या घोषणा फक्त मते मिळवण्यासाठी व निवडणुका जिंकण्यासाठीच होत्या. या तिन्ही महापुरुषांची स्मारके तर झाली नाहीत मात्र 1500 करोड खर्च करून दिल्लीमध्ये भाजपचे कार्यालय उभे राहिले. भाजप सरकार हे अत्यंत खोटे बोलणारे व जुमलेबाज सरकार आहे.

"काँग्रेस आपल्या दारी" या उपक्रमाची माहिती देताना संजय निरुपम म्हणाले की, हा दीड महिना म्हणजेच सहा आठवड्यांचा उपक्रम असून प्रत्येक वॉर्डमध्ये 25 कार्यकर्त्यांची टीम तयार केलेली आहे. हे कार्यकर्ते दर शनिवार व रविवार सायंकाळी दोन तास आपल्या वॉर्डमधील प्रत्येक घरामध्ये जाऊन काँग्रेसचा प्रचार व प्रसार करतील. प्रत्येक कार्यकर्त्याकडे एक बॅग असेल व त्यामध्ये शिवसेना भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराची माहिती असलेली पुस्तिका असेल व आम्ही काँग्रेसचे मतदार असे स्टिकरही असतील. यावेळी संजय निरुपम यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले की, गंभीरपणे काँग्रेस पक्षाचा प्रचार व प्रसार करा. घराघरांत पोहचा, प्रत्येक मतदारपर्यंत पोहोचा.

Web Title: If Congress win Mumbai, then win Maharashtra, win Maharashtra, Delhi wins - Mallikarjun Kharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.