If BJP claims to form government, NCP will vote against it; NCP leader's warned | महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केल्यास...; राष्ट्रवादीचा राज्यपालांना इशारा
महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केल्यास...; राष्ट्रवादीचा राज्यपालांना इशारा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण पाठविले आहे. सत्तास्थापनेची तयारी आहे का? असे पत्र त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले आहे. यावर राष्ट्रवादीने मोठा इशारा दिला आहे. 


राज्यपालांनी भाजपाला 11 नोव्हेंबरला सत्तास्थापनेची संधी दिली आहे. भाजपाची इच्छा आणि ताकद आहे का अशी विचारणा राज्यपालांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना यावर उत्तर द्यावे लागणार आहे. यासाठी उद्या भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून यामध्ये निर्णय घेतला जाईल.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी इशारा दिला आहे. भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केल्यास राष्ट्रवादी विरोधात मतदान करेल. सत्तास्थापनेची ही प्रक्रिया आधीच सुरु करता आली असती. तरीही राज्यपालांनी भाजपाची तेवढी ताकद आहे का याची खातरजमा करणे गरजेचे होते. नाहीतर राज्यात घोडेबाजाराला उत येईल, असा इशारा दिला आहे. ही जबाबदारी राज्यपालांची असल्याचेही मलिक म्हणाले. 


याचबरोबर विरोधात मतदान करणार असल्याचे सांगताना मलिक यांनी पटलावर भाजपाचे सरकार पडल्यानंतर पर्यायी सरकार देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करेल, असेही मलिक यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, याआधी शिवसेना भाजपविरोधात मतदान करते का हे पाहणार असल्याचेही मलिक म्हणाले.


शिवसेनेच्या गोटात खबरदारीचे पाऊल
दरम्यान,  शिवसेनेने मालाड येथील रीट्रीट हॉटेलमध्ये आमदारांना हलविले असून राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिल्याचे वृत्त आल्यानंतर लगेचच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची वर्दळ वाढली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने थेट जयपूरलाच आमदारांना ठेवले असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवाना झाले आहेत. 


अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, गजानन कीर्तीकर, आदेश बांदेकर, एकनाथ शिंदे, रामदास कदम आदी नेते या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. या हॉटेलमध्ये ठेवलेल्या आमदारांशी ते संपर्क साधणार आहेत. 
काँग्रेसने त्यांच्या आमदारांना जयपूरला अज्ञातस्थळी हलविले असून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, निवडणूक प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण जयपूरला रवाना झाले आहेत. उद्या त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. 

Web Title: If BJP claims to form government, NCP will vote against it; NCP leader's warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.