'त्या' दोघांनंतरच मी कोरोना लस घेईन; प्रकाश आंबेडकरांना लसीकरणावर शंका?

By कुणाल गवाणकर | Published: January 16, 2021 04:18 PM2021-01-16T16:18:16+5:302021-01-16T16:26:49+5:30

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून लसीकरणावर अप्रत्यक्षपणे शंका उपस्थित

i will take corona vaccine after pm modi and cm uddhav thackeray says prakash ambedkar | 'त्या' दोघांनंतरच मी कोरोना लस घेईन; प्रकाश आंबेडकरांना लसीकरणावर शंका?

'त्या' दोघांनंतरच मी कोरोना लस घेईन; प्रकाश आंबेडकरांना लसीकरणावर शंका?

Next

औरंगाबाद: जवळपास वर्षभर कोरोना संकटाचा सामना केल्यानंतर आज लसीकरणास आरंभ झाला. कोरोना लसीकरण अभियानास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवात केली. मोदींच्या हस्ते देशव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात लसीकरण अभियानाचा शुभारंभ झाला. मात्र या लसीकरण मोहिमेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लसीकरण मोहिमेबद्दल सवाल विचारले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस टोचून घेतल्यानंतरच मी लस टोचून घेईन, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. 

"इतर राष्ट्रप्रमुखांनी कोरोना लस घेतली, मग केंद्र सरकारमधील जबाबदार नेते मागे का?"

लसीकरणाचा आरंभ करताना काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
भारतात जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान सुरू होत आहे. कोरोना लसीकरणाचा शुभारंभ होतानी सर्व देशवासीयांचे अभिनंदन करतो. ज्याला कोरोना लसीची सर्वांत जास्त गरज आहे, त्यालाच प्राधान्यक्रमाने कोरोना लस मिळणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस यांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस  घेणे गरजेचे आहे. पहिला आणि दुसरा डोस यामध्ये एक महिन्याचे अंतर ठेवले जाणार आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्याने कोरोनाविरोधाची प्रतिकारशक्ती तयार होईल. त्यामुळे निष्काळजीपणा दाखवू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

लसीकरणाला शुभारंभ! आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रम; कोरोना योद्धांसाठी पंतप्रधान मोदी भावुक

कोरोना लसीच्या अपप्रचाराला बळी पडू नका
कोरोना लसीच्या गुणवत्तेबाबत वैज्ञानिक आणि तज्ज्ञ दोन्ही आश्वस्त झाल्यानंतरच याच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली. कोरोना लसीबाबत केल्या जाणाऱ्या अप्रचाराला अजिबात बळी पडू नका. आपल्याला वाचवण्यासाठी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, पोलीस, सफाई कर्मचारी यांनी मानवतेबाबत असलेल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. ते कुटुंबापासून दूर राहिले. अनेक दिवस ते घरी  गेले नाहीत. काही कोरोना योद्धे माघारी घरी परतले नाहीत, असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले. 

काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे?
कोरोना संकटात आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांना कोरोना लसीकरणात प्राधान्य देण्यात येईल. कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सना आजपासून लस देण्यास सुरुवात झाली आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. कोरोना लस सर्वसामान्य नागरिकांना मोफत मिळणार का, असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मोफत मिळणार आहे. सर्वसामान्यांना लस मोफत मिळणार की नाही, याबद्दलचा निर्णय अद्याप केंद्र सरकारनं घेतलेला नाही. केंद्रानं यासंदर्भातला निर्णय घेतला की मग आम्ही निर्णय घेऊ, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.

कोरोना लस सर्वसामान्यांना मोफत मिळणार का?; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...

बेफिकीर राहू नका, बेजबाबदारपणे वागू नका
कोणत्या लसींना मान्यता द्यायची याचा निर्णय केंद्र सरकार घेईल. पण लस आली असली तरी बेफिकीर राहू नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. लसीकरणास सुरुवात झाली आहे. पण म्हणून नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये. मास्क वापरणं, वारंवार हात धुणं आणि सोशल डिस्टन्सिंग राखणं ही कोरोनाला रोखण्याची त्रिसुत्री आहे. ती आपण लक्षात ठेवायला हवी, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली.

Web Title: i will take corona vaccine after pm modi and cm uddhav thackeray says prakash ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.