will take decision after centre takes call cm uddhav thackeray over free covid vaccine to all | कोरोना लस सर्वसामान्यांना मोफत मिळणार का?; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...

कोरोना लस सर्वसामान्यांना मोफत मिळणार का?; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...

मुंबई: देश जवळपास गेल्या वर्षभरपासून कोरोना संकटाचा सामना करत आहे. देशात तब्बल १ कोटीहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली. यातील ९५ लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली. तर जवळपास दीड लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना संकटावर पूर्णपणे मात करण्यासाठी आजपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण अभियानाला प्रारंभ केला आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली.

कोरोना संकटात आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांना कोरोना लसीकरणात प्राधान्य देण्यात येईल. कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सना आजपासून लस देण्यास सुरुवात झाली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. कोरोना लस सर्वसामान्य नागरिकांना मोफत मिळणार का, असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मोफत मिळणार आहे. सर्वसामान्यांना लस मोफत मिळणार की नाही, याबद्दलचा निर्णय अद्याप केंद्र सरकारनं घेतलेला नाही. केंद्रानं यासंदर्भातला निर्णय घेतला की मग आम्ही निर्णय घेऊ, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.कोरोना लसीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे सरकार नियंत्रित आहे. त्यामुळे यामध्ये कोणताही भ्रष्टाचार किंवा काळाबाजार होणार नाही. सध्याच्या घडीला दोन कंपन्यांच्या लसींच्या वापरास परवानगी मिळाली आहे. आणखी एक-दोन कंपन्या रांगेत आहेत. त्यांच्या लसींच्या वापरास लवकरच परवानगी मिळू शकते. तसं झाल्यास राज्यांना मिळणाऱ्या लसींचा कोटा वाढेल आणि लसीकरणाला आणखी वेग येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रानं प्रत्येक राज्याला कोरोना लसीचा कोटा ठरवून दिला आहे. पण यावरून मला राजकारण करायचं नाही, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं.

कोणत्या लसींना मान्यता द्यायची याचा निर्णय केंद्र सरकार घेईल. पण लस आली असली तरी बेफिकीर राहू नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. लसीकरणास सुरुवात झाली आहे. पण म्हणून नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये. मास्क वापरणं, वारंवार हात धुणं आणि सोशल डिस्टन्सिंग राखणं ही कोरोनाला रोखण्याची त्रिसुत्री आहे. ती आपण लक्षात ठेवायला हवी, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: will take decision after centre takes call cm uddhav thackeray over free covid vaccine to all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.