"मी कुठलीही टोकाची भूमिका घेईन"; खंडणीच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 09:08 IST2025-01-30T09:06:40+5:302025-01-30T09:08:46+5:30
Ajit Pawar Beed News: उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत. बीड जिल्ह्याच्या पहिल्या दौऱ्यावर पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला.

"मी कुठलीही टोकाची भूमिका घेईन"; खंडणीच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा
Ajit Pawar Marathi News: बीडचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये दाखल झाल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गेल्या दोन महिन्यांपासून बीड जिल्हा गुन्हेगारीच्या प्रकरणांमुळे चर्चेत असून, त्यावरून अजित पवारांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कान टोचले. 'विकासाची कामे करताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या ते कानावर आल्यावर मकोका लावायला, पण मी मागे पुढे बघणार नाही', अशा शब्दात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बीडमध्ये अजित पवारांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, "बीडच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सध्या पेपरला आपण असतो. त्यामध्ये जिथे तथ्य असेल, तिथे संबंधितांवर कारवाई केली जाईल. जिथे तथ्य नसेल, त्यासंदर्भात कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही. इथे जिल्हाध्यक्ष आहेत, सर्व सेलचे प्रमुख आहेत, मला त्यांना सांगायचं आहे की, माझी कामाची पद्धत थोडी वेगळी आहे. उद्या कुठली कामे मंजूर झाली, तर ती कामे दर्जेदार असली पाहिजेत. त्यामध्ये वेडेवाकडे प्रकार झाले, तर मी सहन करणार नाही. तो राष्ट्रवादी काँग्रेसचा, जवळचा-लांबचा असं काही बघणार नाही. जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे. कुठेही गडबड होता कामा नये", असा इशारा अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला.
अधिकाऱ्यांच्या बदल्या करणार? अजित पवार काय बोलले?
"जर कुणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल. जर कुणी वेडेवाकडे प्रकार केले असतील. विकासाची कामे करताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या ते कानावर आल्यावर मकोका लावायला, पण मी मागे पुढे बघणार नाही. मी कुठलीही टोकाची भूमिका घेईन. मी आधीच देवेंद्रजींना (Devendra Fadnavis) सांगितलं होतं की, मला इकडचं (बीड पालकमंत्री) देत असताना त्यासंदर्भात सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे. त्यात मी अधिकारीही बघणार नाही. काही काही अधिकाऱ्यांना इथे बरेच वर्ष झाली आहेत. त्यातही मी दुरुस्ती करणार आहे", असे म्हणत बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या मुद्द्यावर अजित पवारांनी भाष्य केले.
रील्स खपवून घेणार नाही -अजित पवार
बीड जिल्ह्यातील बंदूका दाखवतानाचे रील्स व्हायरल झाले. त्याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, "मी भेदभाव करत नाही. पण, ज्या चुकीच्या पद्धती पूर्वापार चालत आलेल्या आहेत, त्याला कुठेतरी आळा घातलाच गेला पाहिजे. जर चालत आलेल्या असतील तर... आम्ही बघतो, कधी कधी टीव्हीवर दाखवतात, कुणी रिव्हॉल्वर काढतं, कुणी वर रिव्हॉल्वर उडवतात, कुणी कमरेला रिव्हॉल्वर लावतात. मी विभागाला सांगणार आहे की, जे कुणी रिव्हॉल्वर दाखवत फिरेल, त्याचं लायसन्स रद्द करा. रिव्हॉल्वर स्वसंरक्षणासाठी, कुणी वस्तीवर राहत असेल, तर तुम्ही घेतली पाहिजे. हे जे रील-बिल तुमचे बनतात ना, ते पण मी खपवून घेणार नाही."
"मी नियम सर्वांना सारखा लावणार आहे. मला कुणाला टार्गेट करायचं नाही. पंरतू बदल झाला पाहिजे, हे मलाही जाणवलं पाहिजे आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांनाही जाणवलं पाहिजे. इथल्या लोकांना कळलं पाहिजे की, इथे बदल होतोय", असे अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना म्हणाले.