I was thrown into the 'box' by Marathi film industry no Bollywood : Vikram Gokhale's assassination | मला ’बॉलिवूड’ने नव्हेतर मराठी चित्रपटसृष्टीने ’वाळीत’ टाकले होते : विक्रम गोखले यांचा गौप्यस्फोट

मला ’बॉलिवूड’ने नव्हेतर मराठी चित्रपटसृष्टीने ’वाळीत’ टाकले होते : विक्रम गोखले यांचा गौप्यस्फोट

ठळक मुद्देविक्रम गोखले यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आलेल्या स्वानुभवावर परखड केले भाष्य

नम्रता फडणीस -

पुणे :  मला  ‘बॉलिवूड’ मध्ये कधीही नेपोटिझमचा त्रास झाला नाही, ना कुणी वाईट वागणूक दिली. पण सुरूवातीच्या काळात मराठी चित्रपटसष्टीमध्ये खूप त्रास भोगावा लागला. पंधरा वर्षे मला  ‘वाळीत’ टाकण्यात आले होते....असा गौप्यस्फोट करीत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मराठी चित्रपटसृष्टीलाच घरचा आहेर दिला आहे.      

      कंगनाच्या ’’मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटते’ या वादग्रस्त विधानावर तिच्यात आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. कंगनाच्या या विधानावर अनेक मराठी कलाकारांनी देखील तिला सोशल मीडियावर खडे बोल सुनावले. या वादात आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने देखील उडी घेतली आहे. कंगनाला प्रत्युत्तर देण्याबरोबरच मराठी कलाकार म्हणून मला बॉलिवूडमध्ये  ‘घाटी’ म्हणून संबोधले जायचे असे खळबळजनक विधान तिने केले आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमध्ये मध्ये यशस्वी मराठी कलाकारांना दिल्या जाणा-या वागणुकीबददल काही कलाकारांशी ' लोकमत'ने  संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता ’आम्हाला  या वादात पडायचे नाही नि कृपया ओढूही नका’ असे सांगून काही कलाकारांनी मौन बाळगले. मात्र विक्रम गोखले यांनी याविषयावर रोखठोकपणे भाष्य करीत मराठी चित्रपटसृष्टीवरच ताशेरे ओढले आहेत.         

मला हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कुणी कधी  ‘घाटी’ म्हणून संबोधलं नाही किंवा मराठी म्हणून कुणीही गैरवागणूक दिली  नाही. मी  हिंदीमध्ये तडजोड म्हणून कधीही कुठलीही कामं केली नाहीत. मला काम नाही मिळालं तरी हरकत नाही, मी घरी राहीन हे माझे आचरण आणि विचार होते. या अविर्भावामुळे मराठी चित्रपट क्षेत्राने मला वाळीत टाकले होते. पंधरा वर्ष मी मराठी चित्रपटसृष्टीपासून दूर होतो. चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी निर्माते चित्रपटांसंदर्भात कलाकारांबरोबर तोंडी चर्चा करीत असतं. लिखित स्वरूपात काही दिले जात नसे. त्यामुळे पैसे बुडत असतं .  काही बोलता देखील यायचे नाही. जे बोलतील त्यांना बाहेर फेकले जायचे. त्यावेळी मी स्वत:च्या अटी मुद्रित स्वरूपात छापल्या होत्या आणि त्यावर निर्मात्यांची सही घेत होतो. पण निर्मातेनंतर कळवतो म्हणून कधीच कळवत नसतं. मग बाहेर जाऊन माझ्याविषयी उलटसुलट चर्चा करीत असत अशा शब्दांत विक्रम गोखले यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आलेल्या स्वानुभवावर परखड भाष्य केले. 

...................
देशात मतप्रदर्शन करण्याचा अधिकार प्रत्येकाला..  मुळात कंगना राणावत हिने असा काय गुन्हा केलाय? सुशांत केसमागे ती फक्त ठामपणे उभी राहिली . तिलाही ‘नेपोटिझम’चा सामना करावा लागला एवढंच ती सांगत होती. मुळातच हे ओपन सिक्रेट आहे की बॉलिवूडमध्ये कित्येक जण नशेच्या आहारी गेलेले आहेत. कोण कशाला घाबरत आहे तेच कळत नाही. मुंबई पालिकेने तिच्या घरात घुसून अतिक्रमण तोडले. पण मुंबईमध्ये अशी कितीतरी अनाधिकृत बांधकामे आहेत मग त्यांचे काय? याकडे विक्रम गोखले यांनी लक्ष वेधले.  या देशात प्रत्येकाला आपले मतप्रदर्शन करायचा अधिकार आहे, ते योग्य की अयोग्य हा नंतरचा मुददा आहे. पण तिने मुख्यमंत्री यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला, जो अत्यंत चुकीचा होता. त्यांच्या पदाचा तरी सन्मान राखलाच जायला हवा, असेही ते म्हणाले. 
----------------------------------------- 

 चित्रपटसृष्टी असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो त्यात राजकारण आहेचं. या क्षेत्राला ग्लँमर आहे त्यामुळे प्रत्येकाकडे टँलेंट असेलचं असे नाही. एकतर आपल क्षेत्र नक्की कोणतं आहे ते ठरवावं. राजकारणात जायचंय मग या क्षेत्रात या असं झालंय. पैशासाठी वाट्टेल ते केले जाते. ‘‘बॉलिवूड’ ही एक मानसिकता बनली आहे. ग्लँमर, पैसा आणि क्षेत्र असे एक समीकरण झाले आहे. जगणं आणि त्याप्रमाणं इच्छित हालचाली घडवून आणण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत- डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: I was thrown into the 'box' by Marathi film industry no Bollywood : Vikram Gokhale's assassination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.