"मी २५ वर्षं आमदार, १० वर्ष लोकसभेचा खासदार...!"; छावाचे कार्यकर्ते आले, पत्ते टाकले, नंतर काय घडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:16 IST2025-07-21T13:16:00+5:302025-07-21T13:16:26+5:30
यासंदर्भात सुनील तटकरे यांनी, "मी 25 वर्षे आमदार राहिलो आणि आता 10 वर्षे लोकसभेचा खासदार आहे (राज्यसभेचा नाही) आणि प्रदेशाध्यक्ष आहे," असे म्हणत स्पष्ट शब्दात भाष्य केले आहे.

"मी २५ वर्षं आमदार, १० वर्ष लोकसभेचा खासदार...!"; छावाचे कार्यकर्ते आले, पत्ते टाकले, नंतर काय घडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेण्यासंदर्भात निवेदन देणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान, तटकरेंच्या सांगण्यावरूनच सूरज चव्हाणने मारहाण केली, असा आरोप छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांनी केला आहे. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून आज छावा संघटनेने लातूर बंदची हाक दिली आहे. यानंतर आता, छावाचे कार्यकर्ते आले, पत्ते टाकले, नंतर काय घडलं? यासंदर्भात सुनील तटकरे यांनी, "मी 25 वर्षे आमदार राहिलो आणि आता 10 वर्षे लोकसभेचा खासदार आहे (राज्यसभेचा नाही) आणि प्रदेशाध्यक्ष आहे," असे म्हणत स्पष्ट शब्दात भाष्य केले आहे.
एक तर, आमची पत्रकार परिषद सुरू असताना, आपण सर्वजण उपस्थित होतात. एक तासभर पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना मी अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात उत्तरं दिली. त्याच वेळी छावा संघटनेचे काही सहकारी आले आणि त्यांनी निवेदन देत असताना काय झाले ते आपण सर्वांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी ते पत्ते टाकली तरीही, मी शांतपणे उभे राहून त्यांचे निवेदन घेतले. एक सभ्य राजकारणी म्हणून, माझ्याकडून जे करणे अपेक्षित होते, त्या अपेक्षेपेक्षाही अधिक सौहार्दपूर्ण वातावरणात मी केले. उठून निवेदन स्वीकारल्यानंतर, मी धन्यवाद म्हणालो.
यानंतर मी लातूर शहरातील बुद्धिमान आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींशी संवाद साधला. तो जवळपास दीड तास चालला. त्यांच्या कृषी, शिक्षण, वैद्यकीय आणि कायदेशीर क्षेत्रांतील विविध प्रश्नांना मी सविस्तरपणे उत्तरे दिली. त्यावेळी बाहेर काय घडले हे मला माहीत नाही, पण जेव्हा तुमच्यामार्फत घडलेली घटना समजली, तेव्हा मी कडक शब्दात त्याचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे कधीही करत नाही. जे घडले ते अत्यंत चुकीचे आहे. या संदर्भात माझी भूमिका स्पष्ट आहे.
सुरज चव्हाणांवर काही कारवाई होणार का? कारण पक्षाकडून म्हटले जाते की, आम्ही असे समर्थन करत नाही, पण ते कृतीतून दिसणार आहे का? यावर बोलताना तटकरे म्हणाले, "ते बघूया ना आता, त्यांना आज राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलावले आहे, सुरज चव्हाण रात्रीच तिकडे गेले आहेत. या संदर्भात सर्वजण बसून योग्य तो निर्णय घेऊ. आम्ही आतापर्यंत कधीही अशा गोष्टींचे समर्थन केलेले नाही. माझ्या राजकीय जीवनामध्येही असे कधी झालेले नाही.
पाटलांचे म्हणणे आहे की लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत होतो; कृषिमंत्र्यांनी जे केले, त्याची ती लोकशाही मार्गाने दिलेली प्रतिक्रिया होती? यावर तटकरे म्हणाले, त्याबद्दल मी कुठे आक्षेप घेतला? एकेक ऐका, आपण तेथे होतात. काय मार्गाने केले काय मार्गाने केले नाही? माझं त्याबद्दल आताही काही म्हणणे नाही. निवेदन देण्याची आणि स्वीकारण्याची पद्धत आहे. पण त्या सर्व पद्धतींना बाजूला सारत जरी केलं गेलं, तरी मला त्याबद्दल आक्षेप नाही. एवढे सगळे मोठ्या आवाजात बोलत होते, मी शांतपणे ऐकले. पण पत्ते टाकल्यानंतरही मी परत उठून निवेदन घेतले. मी बसूनही घेऊ शकलो असतो, पण मी उठलो याचे कारण, मला त्या निवेदनाचा आदर करायचा होता.
मी 25 वर्षे आमदार राहिलो आणि आता 10 वर्षे... -
एक लक्षात घ्या, मी 25 वर्षे आमदार राहिलो आणि आता 10 वर्षे लोकसभेचा खासदार आहे (राज्यसभेचा नाही) आणि प्रदेशाध्यक्ष आहे. यामुळे, मी निवेदनाचा आदर केला. पत्रके टाकल्यानंतरही मी उभा राहून ते स्वीकारले आणि धन्यवाद मांडले. आता यापेक्षा माझ्याकडून काय पाहिजे? मी मगापासून चार वेळा सांगितले, जे घडले ते चुकीचे आहे, योग्य नाही; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचे कधीही समर्थन करणार नाही.