"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 17:21 IST2025-11-27T17:20:42+5:302025-11-27T17:21:38+5:30
Bjp vs Shivsena Clash: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आज जळगाव दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांनी निलेश राणे यांच्या आरोपांवर प्रश्न विचारले.

"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
शिवसेना आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांवरून राज्यात महायुतीत मोठी कुस्ती सुरु झाली आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर रविंद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पाडण्यास सुरुवात केल्याने शिंदे गोटात मोठी खळबळ उडाली होती. खासदार पूत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात चव्हाणांनी पक्षप्रवेश करण्यास सुरुवात केली आणि या वादाला ठिणगी पडली होती. उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीपर्यंत तक्रार करून झाली. परंतू, काहीच फरक पडला नाही. अशातच बुधवारी आमदार निलेश राणे यांनी मालवणमध्ये चव्हाण भेट देऊन गेलेल्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकत त्याच्या घरी पैशांच्या थप्प्या असलेली पिशवी पकडली होती. यावर आता रविंद्र चव्हाणांनी मोठे भाष्य केले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आज जळगाव दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांनी निलेश राणे यांच्या आरोपांवर प्रश्न विचारले. सुरुवातीला रविंद्र चव्हाण यांनी काढता पाय घेतला. परंतू, नंतर कारची काच खाली करून मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची असल्याचे वक्तव्य केले आहे. यानंतरच यावर मी उत्तरे देईन, असेही ते म्हणाले आहेत.
शिवसेना आमदार निलेश राणे यांनी चव्हाण हे आदल्यादिवशी मालवणमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी आले होते, त्यांनीच हे पैसे दिले असल्याचा आरोप केला आहे. यावरून मालवणात जोरदार राजकारण रंगले आहे. राज्यात शिवसेना आणि भाजपात आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. शिंदे आणि फडणवीस एका कार्यक्रमात बोलले नाहीत, असेही सांगितले जात आहे. अंतर ठेवून होते, असे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. अशातच महायुतीत मोठी घडामोड घडण्याचे संकेत मिळत असताना चव्हाण यांचे हे वक्तव्य बरेच काही सांगून जात आहे.