'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 14:17 IST2025-07-09T14:16:24+5:302025-07-09T14:17:29+5:30

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमधील कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाण प्रकरणाचे विधान मंडळात पडसाद उमटले. अनिल परब यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली. 

'I saw the video, people will think we are misusing power'; CM Fadnavis said on Sanjay Gaikwad case | 'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं

'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं

Devendra Fadnavis on Sanjay Gaikwad: आमदार निवासातील कँटिनमध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी गोंधळ घातला. जेवण खराब असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट कँटिनमधील कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली. आमदार गायकवाड यांच्या या कारनाम्याचा मुद्दा विधान परिषदेत शिवसेनेचे (यूबीटी) आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यांनी संजय गायकवाड यांचे निलंबन करण्याचीच मागणी केली. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त करत कानउघाडणी केली. त्यांनी अध्यक्षांना या प्रकरणाची दखल घेऊन काय कारवाई करायची ती करावी, अशी भूमिका मांडली.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

विधान परिषदेत संजय गायकवाड यांच्या मारहाणीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडीओ मी स्वतः बघितला आहे. अशा प्रकारचे वर्तन आपल्या कुणासाठीही भूषणावह नाही. याच्याने विधिमंडळाची आणि आपल्या सगळ्यांची आणि आमदारांची प्रतिष्ठा, प्रतिमा कमी होते."

वाचा >>'वरण-भाता'ने घडवला राडा; आमदार निवासातील वाद विकोपाला का गेला? आमदार गायकवाड म्हणाले...

"माहिती अशी आली की आमदार निवासातील व्यवस्था नीट नव्हती. भाजी वास मारत होती. या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते. त्याच्यावर कारवाई करता येते. तो वेगळा मुद्दा आहे. अध्यक्ष महोद, आमदार निवासामध्ये काहीही अनियमितता असेल, तर आपण स्वतः लक्ष घालावं", असे देवेद्र फडणवीस म्हणाले.

आमदारांबद्दल लोकांच्या मनात चुकीची भावना जाते -फडणवीस 

"अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधीने मारहाण करणे आणि त्याचे व्हिडीओ येणे. टॉवेलवर येऊन मारलं किंवा कसेही मारले तरी ते चुकीचेच आहे. योग्य नाहीये. यातून सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीची भावना जाते", असे म्हणत फडणवीसांनी खंत व्यक्त केली. 

संजय गायकवाड मारहाण करतानाचा व्हिडीओ

"आपण सत्तेचा गैरवापर करतोय किंवा आमदार म्हणून आपलं वर्तन योग्य नाही, असे लोकांना वाटेल. ही गंभीर बाब आहे. अध्यक्षांनी याची दखल घ्यावी आणि यासंदर्भात काय कारवाई करायची, ती करावी", अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षांना केली. 

Web Title: 'I saw the video, people will think we are misusing power'; CM Fadnavis said on Sanjay Gaikwad case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.