"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
By निलेश जोशी | Updated: May 16, 2025 16:14 IST2025-05-16T16:11:17+5:302025-05-16T16:14:10+5:30
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना चिमटा काढला.

"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
- नीलेश जोशी, बुलढाणा
Devendra Fadnavis News: “कथा-कादंबऱ्या वाचणं आम्ही केव्हाच सोडलं आहे. आता माझं बालवाङ्मय वाचण्याचं वयही राहिलेलं नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना खोचक टोला लगावला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भाजपच्या बुलडाणा जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त फडणवीस शहरात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ‘नरकातला स्वर्ग’ या संजय राऊत लिखित पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला.
राऊतांच्या पुस्तकाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस काय बोलले?
या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत काही दावे करण्यात आले असून, “आम्ही अजून काही लिहिलं असतं, तर धमाका झाला असता,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
वाचा >>"मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, "कथा-कादंबऱ्या वाचणं आम्ही केव्हाच सोडलं आहे. आता माझं बालवाङ्मय वाचण्याचं वयही राहिलेलं नाही. अशा गोष्टींवर फार गांभीर्याने विचार करण्याची गरज नाही", असेही ते म्हणाले. "ते कोण आहेत? मोठे नेते आहेत का?" असा प्रश्न उपस्थित करून फडणवीसांनी राऊतांना डिवचले.
महायुतीतच लढणार स्थानिक निवडणुका
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढवण्यात येतील. काही अपवादात्मक ठिकाणी वेगळ्या भूमिका असतील, तरी त्या परस्पर समन्वयातून ठरवण्यात येतील. याबाबत आपण गुरूवारीच काही बाबी स्पष्ट केल्याचे ते म्हणाले.
डीजी लोणचा प्रश्न मार्गी
पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांना डीजी कार्यालयाच्या शिफारशीनुसार मिळणाऱ्या कर्जाची प्रकरणे दोन वर्षापासून प्रलंबीत असल्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की त्यासाठीची आवश्यक परवानगी दिल्या गेली आहे. हा विषय मार्गी लागला असल्याचे ते म्हणाले.