" मी पण 'इंगित' भाषा शिकून घेतो, म्हणजे अजितदादांच्या मनात नेमकं काय चाललंय हे मलाही समजेल..!"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 04:59 PM2021-02-19T16:59:15+5:302021-02-19T17:07:46+5:30

मग त्यांनी मास्क, गॉगल जरी घातला तरी त्यांच्या मनात, डोळ्यामध्ये काय चाललंय ते मला जाणून घेता येईल...

... I also learn the 'ingit' language, so I can understand what is going on in Ajit Dada's mind: CM | " मी पण 'इंगित' भाषा शिकून घेतो, म्हणजे अजितदादांच्या मनात नेमकं काय चाललंय हे मलाही समजेल..!"

" मी पण 'इंगित' भाषा शिकून घेतो, म्हणजे अजितदादांच्या मनात नेमकं काय चाललंय हे मलाही समजेल..!"

Next

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांना सहा ते सात प्रकारच्या भाषा येत होत्या. यामध्ये इंगितविद्या अशीही एक भाषा होती. या भाषेमुळे समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय हे ओळखता येत होते. तसेच आपल्या नजरेच्या इशार्‍यावर माणसांना काही सूचना देता येत असत. अशा प्रकारची इंगित विद्या सध्याच्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साध्य आहे अशी टिपण्णी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच केली. मग काय या टिप्पणीवर मुख्यमंत्र्यांनी पण मला ही इंगित विद्या शिकायचीच आहे; म्हणजे अजितदादांच्या मनात काय चाललंय हे ओळखता येईल अशा विनोदी शैलीत भाष्य केले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे, डॉ.अमोल कोल्हे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, आमदार विनायक मेटे, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, आत्ताच अजितदादांना इंगित विद्या अवगत आहे, असे अतुल बेनके यांनी सांगितले. मी देखील इंगित विद्या शिकून घेणार आहे. म्हणजे मला देखील अजितदादांच्या मनात काय चाललंय ते ओळखता येईल. मग त्यांनी मास्क, गॉगल जरी घातला तरी त्यांच्या मनात, डोळ्यामध्ये काय चाललंय ते मला जाणून घेता येईल. 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. छत्रपती शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या शौर्याची, त्यागाची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष, महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आणि त्यांना आदर्श मानणारे कोट्यवधी युवक, आजही गावागावात महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवत आहेत, हे या भूमीचं, आपल्या सर्वांचं भाग्य आहे.  कोरोना नियमांचं पालन करुन शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊ दे. 

 

Web Title: ... I also learn the 'ingit' language, so I can understand what is going on in Ajit Dada's mind: CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.